“राजमाता अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकर्त्यांनी चालावे ;
दिपकआबा साळुंखे पाटील यांचे प्रतिपादन”
सांगोला : “प्रजेच्या हितासाठी राजकारभार कसा असावा, याचा आदर्श शेकडो वर्षांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी घालून दिला आहे.
आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रविवार, दि. ३१ मे रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष म्हाळप्पा शिंगाडे यांच्या हस्ते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास दिलीप मस्के, दत्तात्रय जानकर, दिलीप जानकर, देविदास गावडे यांच्यासह धनगर समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दरबारात सामान्य जनतेला न्याय मिळत होता.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत लोककल्याणकारी निर्णय घेत रोजगारनिर्मितीवर भर दिला.
तसेच देशभरातील अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून सांस्कृतिक वारसा जपण्याचे मोठे कार्य केले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रशासन, न्यायव्यवस्था, समाजकारण आणि धर्मकार्य या सर्व क्षेत्रांत आदर्श निर्माण केला.
त्यांच्या विचारांवर चालल्यासच समाजहिताचा कारभार उभा राहू शकतो, असेही दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी नमूद केले.


0 Comments