“चार नंबर कॅनॉलचे पाणी कागदावरच?; फोटोसेशननंतरही शेवटच्या शेतापर्यंत थेंब नाही”
सांगोला तालुक्यातील चार नंबर कॅनॉलवर पाणी सोडल्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. काही लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांनी कॅनॉल परिसरात जाऊन फोटोसेशन करत
श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून शिवणे, वाकी, धायटी, शेळकेवाडी, एकतपूरसह परिसरातील अनेक शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पाणी सोडल्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला समाधानाचे वातावरण होते. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये करपणाऱ्या ऊस व इतर पिकांना आता दिलासा मिळेल,
अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु चार दिवस उलटूनही कॅनॉलचे शेवटचे टोक कोरडेच असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याचे सांगितले जाते, मग आमच्या शेतापर्यंत ते पोहोचत का नाही?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
अनेकांनी पिकांसाठी मोठा खर्च करून लागवड केली आहे. मात्र पाण्याअभावी ऊसासह इतर पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, केवळ कॅनॉलवर जाऊन फोटो काढणे आणि प्रसिद्धी करणे यापेक्षा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे.
प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून चार नंबर कॅनॉलवरील पाणी नियमित व पूर्ण दाबाने सोडावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, “फोटोसेशन नको, शेतात पाणी हवं,” अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


0 Comments