Breaking News

२५ हजार मतांच्या पराभवानंतर शहाजीबापूंचा तोल ढासळला; नंदकुमार शिंदेंची घणाघाती टीका

२५ हजार मतांच्या पराभवानंतर शहाजीबापूंचा तोल ढासळला; नंदकुमार शिंदेंची घणाघाती टीका


सांगोला : सांगोला विधानसभा निवडणुकीत झालेला मोठा पराभव अजूनही शहाजीबापू पाटील यांच्या मनातून गेलेला नसून, त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी कामगार पक्षावर सातत्याने टीका करत 

असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे यांनी केला आहे. वेळापूर येथील सभेत शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी जोरदार पलटवार केला.

नंदकुमार शिंदे म्हणाले की, “जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २५ हजार मतांनी शहाजीबापू पाटील यांना नाकारून शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर विश्वास दाखवला. 

एवढा मोठा कौल मिळाल्यानंतरही पराभव स्वीकारण्याची मानसिकता शहाजीबापूंमध्ये दिसत नाही. त्यामुळेच ते विकासाच्या नावाखाली स्वतःची पाठ थोपटत विरोधकांवर आरोप करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “शहाजीबापू पाटील यांनी सभेत विशिष्ट जातींचा उल्लेख करून राजकारणात जातीयतेचे विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. सांगोला तालुक्याची परंपरा ही पुरोगामी आणि सुसंस्कृत आहे. येथे जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न जनता सहन करणार नाही.”

शिंदे यांनी दावा केला की, “जर खरोखरच शहाजीबापूंनी सांगितल्याप्रमाणे हजारो कोटींचा विकास केला असता, तर जनता त्यांना एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत केली नसती. जनतेने दिलेला निकाल हाच अंतिम निर्णय असतो आणि तो मोठ्या मनाने स्वीकारणे हे लोकशाहीचे लक्षण आहे.”

तसेच त्यांनी शहाजीबापूंना स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या राजकीय परंपरेचा आदर्श घेण्याचा सल्लाही दिला. “तालुक्यात शांतता

 आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी सभ्य राजकारण आवश्यक आहे. खोटे आरोप आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत,” असेही त्यांनी नमूद केले.

चौकट : “पुराव्यानिशी गौप्यस्फोट करू”

यापुढेही शहाजीबापू पाटील यांनी बेछूट आरोप सुरूच ठेवले, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्या गावात दुबार मतदार नोंदवले गेले

 आणि मयत व्यक्तींच्या नावावर मतदान झाले याची माहिती पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असा इशाराही नंदकुमार शिंदे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments