रिल्सच्या झगमगाटामागचं दुःख! मंगळवेढ्यातील लोकप्रिय रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूमागे ‘हा’ ताण कारणीभूत?
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील लोकप्रिय रिलस्टार रोहिणी नीलेश पाराध्ये हिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
सोशल मीडियावर लाखो लोकांना आपल्या गावरान शैलीतील रिल्सने भुरळ घालणाऱ्या रोहिणीने अचानक उचललेल्या टोकाच्या पावलामागे कौटुंबिक आणि व्यावसायिक तणावाचे कारण समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे.
हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास
२५ वर्षीय रोहिणी पाराध्ये हिने ब्रह्मपुरी येथील स्वतःच्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सोशल मीडियातून मिळाली ओळख
रोहिणी आणि तिचे पती नीलेश पाराध्ये यांनी प्रेमविवाह केला होता. काही काळ पुण्यात वास्तव्यास असताना त्यांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सुरुवात केली.
गावरान जेवण, खानावळीतील कामकाज आणि ग्रामीण जीवनशैलीवर आधारित व्हिडीओंमुळे हे जोडपे अल्पावधीत लोकप्रिय झाले.
यानंतर दोघेही मूळ गावी परतले आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाने व्यवसाय सुरू केला. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या हॉटेलला मोठा प्रतिसाद मिळू लागला. व्यवसाय वाढत गेल्यानंतर त्यांनी आणखी दोन शाखा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
वाढता व्यवसाय आणि मानसिक ताण
मात्र, वाढत्या व्यवसायासोबत आर्थिक जबाबदाऱ्या आणि व्यवस्थापनाचा ताणही वाढत गेला. एकाच वेळी तीन शाखांचे नियोजन, आर्थिक व्यवहार,
कर्मचारी व्यवस्थापन आणि सोशल मीडियावरील सक्रियता यामुळे रोहिणी आणि तिच्या पतीवर मोठा मानसिक दबाव निर्माण झाला होता, अशी माहिती स्थानिक पातळीवरून समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, पोलिसांकडून या सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे.
परिसरात हळहळ
रोहिणीच्या निधनानंतर ब्रह्मपुरी गावासह सोशल मीडिया वर्तुळात शोककळा पसरली आहे. “नेहमी हसतमुख दिसणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात इतका ताण असेल, याची कल्पनाही नव्हती,” अशा भावना तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.


0 Comments