Breaking News

जमिनीच्या वादाची रक्तरंजित परिणती! सीमाभाग हादरला; गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्यात ६ जणांची निर्घृण हत्या

जमिनीच्या वादाची रक्तरंजित परिणती!


सीमाभाग हादरला; गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्यात ६ जणांची निर्घृण हत्या

मंगळवेढा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण सीमाभाग हादरून गेला आहे. 

चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या जुन्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या ताब्यावरून वाद सुरू होता. 

हा वाद विकोपाला गेल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी काही अज्ञात हल्लेखोर गावात दाखल झाले. त्यांनी थेट निराळे कुटुंबीयांवर हल्ला चढवला.

घरालगतच्या शेत परिसरात उपस्थित असलेल्या सहा जणांवर प्रथम गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काहींवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

हल्ल्याची क्रूरता इतकी भीषण होती की काही जणांचे हात छाटण्यात आले, तर काहींच्या चेहऱ्यावर गंभीर वार करण्यात आले. घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला.

या घटनेत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील आणि मुलांचाही समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा गावात दाखल झाला. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला

 असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातही खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments