सांगोल्यात उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर
अभियान – टप्पा १” अंतर्गत सांगोला येथे शुक्रवार, दि. ८ मे २०२६ रोजी विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाउन हॉल), सांगोला येथे पार पडणार असून
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय तसेच विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात
आलेल्या या अभियानाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन अडचणींचे त्वरित निराकरण करणे,
नागरिकांच्या तक्रारी जागेवर सोडवणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम बनवणे हा आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध सेवा व योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे,
अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, भूसंपादन कमी-जास्त पत्रक,
एक खिडकी योजना, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, सर्वांसाठी
घरे व पट्टेवाटप यादी तयार करणे, शिधापत्रिका संदर्भातील सेवा तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनांचा समावेश आहे.
सदर शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी सोलापूर तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिली.
नागरिकांनी आपल्या महसूल विषयक समस्या व कागदपत्रांसह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


0 Comments