सांगोल्यात बनावट ओळखीत लपलेला मोक्का आरोपी जेरबंद; पुणे गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
पुणे : मोक्का कायद्यान्वये दाखल गंभीर गुन्ह्यात तब्बल आठ महिन्यांपासून फरार
असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने सोलापूर जिल्ह्यातील
सांगोला तालुक्यातून अटक केली आहे. स्वतःची ओळख लपवून निजामपूर परिसरात
वास्तव्यास असलेल्या या आरोपीवर दोन दिवस सलग पाळत ठेवून पोलिसांनी शिताफीने कारवाई केली.
गुरूदत्त साळवे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो निलेश घायवळ टोळीशी संबंधित मोक्का गुन्ह्यात फरार होता.
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे, आर्म अॅक्ट तसेच मोक्का कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार संदिप शेळके यांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली होती.
तपासादरम्यान आरोपी सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे बनावट ओळख वापरून वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सोलापूरकडे रवाना करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग दोन दिवस आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर निजामपूर गावातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
सांगोला पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला पुण्यात आणण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर पुढील चौकशीसाठी त्याला गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले असून, कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, गुन्हा करून पळून
गेलेल्या आरोपींना शोधून काढले जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


0 Comments