सोलापूर हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; पती फरार
सोलापूर | प्रतिनिधी : शहरातील लोकमान्य नगर परिसरात धक्कादायक घटना घडली असून, कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत
जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये विवाहबद्ध झालेल्या नर्गिस शेख आणि फैजान शेख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर जखमी नर्गिस यांनी आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली आणि तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फैजान शेख फरार आहे.
त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत. या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.


0 Comments