गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात रेशनवर केरोसीन वाटपाला पुन्हा सुरुवात
सोलापूर : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात संभाव्य एलपीजी गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात
घेऊन शासनाने पुन्हा एकदा शिधावाटप दुकानांतून केरोसीन (रॉकेल) वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे २०१६ पासून बंद असलेले रॉकेल वाटप तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाले असून, सोलापूर जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ४४ हजार लिटर केरोसीनचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२ हजार लिटरचा टँकर जिल्ह्यात दाखल झाला
असून, वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कोट्यात ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार लिटर तर सोलापूर शहरासाठी १२ हजार लिटरचा वाटा निश्चित करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत केरोसीनच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २०१६ च्या तुलनेत दरात सुमारे २२ ते २३ रुपयांनी वाढ झाली असून, आता शिधापत्रिकाधारकांना
प्रतिलिटर अंदाजे ६२ ते ६३ रुपये दराने रॉकेल उपलब्ध होणार आहे. वाहतूक खर्चानुसार तालुकानिहाय दरांमध्ये किरकोळ फरक असू शकतो, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एलपीजी गॅस सर्वत्र उपलब्ध झाल्यामुळे गेल्या दशकात पारंपरिक स्टोव्हचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता.
मात्र आता रॉकेल उपलब्ध होत असल्याने काही कुटुंबांना पुन्हा स्टोव्ह आणि त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करावे लागणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांनी पर्यायी इंधन म्हणून या रॉकेलचा योग्य वापर करावा, असे आवाहन केले आहे.
संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments