डबा देण्यासाठी निघाला… पण परतलाच नाही! बाळाचा जन्म, वडिलांचा मृत्यू — नियतीचा क्रूर खेळ मंगळवेढा तालुक्यातील घटना..
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने एक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला जेवणाचा डबा देण्यासाठी निघालेल्या तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याच रात्री त्याच्या घरी आनंदाची बातमी आली — पण तो आनंद पाहण्यासाठी तो स्वतः हयात नव्हता.
मनोहर सोमराया सुंठे (वय २४, रा. शिवनगी, ता. मंगळवेढा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
त्यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी मंगळवेढ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रविवारी सायंकाळी सुमारे ७:१५ वाजता मनोहर हे आपल्या चुलत भावासोबत दुचाकीवरून पत्नीसाठी डबा घेऊन निघाले होते.
हुलजंती गावाजवळील सोड्डी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करताना चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत मनोहर रस्त्याच्या कडेला फेकले गेले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने दुःखाला आणखी तीव्र वळण दिले ते म्हणजे सोमवारी पहाटे मनोहर यांच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
मात्र, आपल्या बाळाचे पहिले दर्शन घेण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही.
घरात एका बाजूला नवजात बाळाच्या आगमनाचा क्षीण आनंद, तर दुसऱ्या बाजूला कर्त्या व्यक्तीच्या अकाली जाण्याचे
प्रचंड दुःख — अशा दुहेरी भावनांमध्ये सुंठे कुटुंब सापडले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments