महामार्गावर थरारक हल्ला; कार अडवून दोघांना बेदम मारहाण, सांगोल्यात चार जणांवर गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा–कोल्हापूर महामार्गावर भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेत कार अडवून दोन जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, सिध्देश्वर महादेव माने (वय ३२, रा. वाढेगाव) हे आपल्या भाचा अतुलसोबत १ मे रोजी दुपारी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारने प्रवास करत होते.
दीघेवाडी हद्दीत स्वराज हॉटेलजवळ पोहोचताच आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून कार आडवी लावली.
यानंतर धनाजी जानकर, गणेश काळे, शुभम वारे आणि धनाजी पवार यांनी लोखंडी रॉड, स्टील पाईप आणि लाकडी काठ्यांनी दोघांवर तुफान हल्ला चढवला.
या हल्ल्यात माने आणि त्यांचा भाचा अतुल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत शिवीगाळ व धमक्या दिल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सांगोला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments