एल-निनोच्या संकटावर सांगोल्यात ‘जलतारा’चा उपाय; कृषी विभागाचे शोषखड्डे अभियान वेगात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : वाढत्या तापमानासह संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागाने “जलतारा शोषखड्डे अभियान” हाती घेतले असून या मोहिमेला आता वेग आला आहे.
लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामांना चालना मिळत असून शेतकऱ्यांमध्येही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शोषखड्डे तयार करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. एका एकरासाठी एक शोषखड्डा ही अट लागू असून शेतात पावसाचे पाणी मुरवून भूजल पातळी वाढविण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
तालुक्यातील राजुरी येथे शेतकरी पांडुरंग खुळे यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष शोषखड्ड्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी शोषखड्डा तयार करण्याची योग्य पद्धत, त्याचे तांत्रिक निकष आणि जलसंधारणासाठी होणारे फायदे याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उप कृषी अधिकारी श्रीधर शेजवळ यांनी सांगितले की, केवळ खड्डा खणून उपयोग होत नाही तर वैज्ञानिक पद्धतीने जलपुनर्भरण केल्यास विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई कमी होऊन शेती उत्पादनालाही फायदा होतो.
यावेळी संतोष यजगर, सचिन खुळे, गणेश दबडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत यांनी सांगितले की, साधारणपणे ५ फूट लांब, ५ फूट रुंद आणि ६ फूट खोल आकाराचे शोषखड्डे उताराच्या बाजूला किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी तयार केल्यास पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते.
त्यामुळे आसपासच्या जलस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होते. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आणि लोकसहभागातून अधिकाधिक जलतारा शोषखड्डे उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


0 Comments