Breaking News

“थकबाकीच्या विळख्यात शिरभावी पाणी योजना; सांगोल्याच्या जीवनदायिनीसमोर आर्थिक संकट”

“थकबाकीच्या विळख्यात शिरभावी पाणी योजना;


सांगोल्याच्या जीवनदायिनीसमोर आर्थिक संकट”

सांगोला : सांगोला तालुक्याची तहान भागवणारी आणि राज्यभर आदर्श ठरलेली शिरभावी व ८१ गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत असलेल्या या योजनेवर गावांकडून वाढत चाललेल्या थकबाकीचा मोठा बोजा निर्माण झाला असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

एप्रिल २०२६ अखेर तब्बल ५९ गावांकडे १ कोटी ६२ लाख ६७ हजार १६१ रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. त्यामुळे योजनेच्या दैनंदिन खर्चासह देखभाल व

 दुरुस्तीच्या कामांवर ताण वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, काही गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने आर्थिक नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या तालुक्यातील १७ गावांनी पाणीपुरवठ्याची मागणी केली असून त्यापैकी १२ गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. शिरभावी योजनेमुळे 

सांगोला तालुक्याला ऐन उन्हाळ्यातही सुरळीत पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून ओळख मिळाली होती. 

वर्षभर अखंडित सेवा देणारी ही योजना आता मात्र थकबाकीच्या वाढत्या संकटामुळे अडचणीत आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, वाढत्या देणीमुळे योजनेच्या वीजबिल, यंत्रसामग्री दुरुस्ती, कर्मचारी वेतन आणि पाइपलाइन देखभाल यांसारख्या आवश्यक खर्चांवर परिणाम होत आहे.

 वेळेवर निधी उपलब्ध न झाल्यास भविष्यात पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायती व संस्थांना थकीत रक्कम तातडीने जमा करण्याचे आवाहन केले आहे.

 अन्यथा आगामी काळात पाणीपुरवठा नियोजन आणि सेवा सुरळीत ठेवणे कठीण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments