सांगोला तालुक्यात अवैध हातभट्टी दारूचा सुळसुळाट; विषारी दारूमुळे जीविताला धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष?
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध हातभट्टी दारू आणि विना परवाना देशी-विदेशी
दारू विक्रीने पुन्हा डोके वर काढले असून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या विषारी दारूमुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
तालुक्यातील गावोगावी गल्लीबोळात अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू असून दिवस-रात्र या ठिकाणी दारू विक्री सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. हातभट्टी दारूचे उत्पादन ओढे,
डोंगरदऱ्या आणि झाडी भागात गुप्तपणे केले जात असून त्यासाठी युरिया, नासका गूळ व इतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जात
असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ही दारू अत्यंत विषारी ठरत आहे.
दरम्यान, विना परवाना देशी व विदेशी दारूचीही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांमधून खुलेआम दारूचा पुरवठा केला
जात असल्याचे चित्र असून काही ठिकाणी बनावट विदेशी दारू विक्री होत असल्याचीही चर्चा आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे, संबंधित विभागाकडून कारवाई होत असली तरी ती केवळ दिखावूपुरती असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
काही वेळा अधिकारी येऊन कारवाईच्या नावाखाली दंड आकारून विक्रेत्यांना सोडून देतात,
अशीही तक्रार आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला मूकसंमती मिळत असल्याची भावना जनतेत आहे.
स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या हातभट्टी दारूमुळे सर्वसामान्य नागरिक त्याकडे आकर्षित होत आहेत.
मात्र याच दारूमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांची मागणी:
या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन अवैध दारू विक्री आणि उत्पादनावर कठोर कारवाई करावी,
तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून हा व्यवसाय पूर्णपणे बंद करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


0 Comments