टँकर मंजुरीसाठी प्रशासनाला 48 तासांची मुदत; पाणीटंचाईवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कडक निर्देश
गावातून प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ निर्णय घ्या; जिल्ह्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
सोलापूर, दि. 11 : जिल्ह्यातील कोणत्याही गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी झाल्यानंतर प्रशासनाने अवघ्या 48 तासांत त्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी
स्पष्ट निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
नियोजन भवन येथे झालेल्या पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे,
आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, उत्तम जानकर, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, अभिजीत पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, गावातून टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी 24 तासांत तो प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवावा
आणि त्यानंतर पुढील 24 तासांत प्रशासनाने त्यास मान्यता द्यावी. “पाणीप्रश्नात दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या अक्कलकोट तालुक्यातील एका गावाला तर माळशिरस तालुक्यातील चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात
ही संख्या 40 टँकरपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. टंचाई कृती आराखड्यातील 24 तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित कामे तातडीने सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.
बैठकीत उजनी धरणातील पाणीसाठ्यावरही चर्चा झाली. धरणातील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून नवीन आवर्तने देणे
शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी मंगळवेढा येथील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसह विविध पाणीपुरवठा योजनांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी केली
तसेच गावातून मागणी होताच प्रशासनाने तात्काळ पाहणी करून टँकर सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.


0 Comments