“थरकाप उडवणारी घटना! ‘माझं जेवण कुणी खाल्लं?’ म्हणत मुलाकडून आईवर जीवघेणा हल्ला”
मंगळवेढा: आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात समोर आली आहे. केवळ जेवणाच्या क्षुल्लक
कारणावरून संतापलेल्या मुलाने स्वतःच्या आईवर कढईने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव वस्ती येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय संगीता जाधव यांनी ७ एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला होता.
जेवण आटोपल्यानंतर त्या घरासमोर बसून कणसे सोलत होत्या. त्याचवेळी त्यांचा
मुलगा ओंकार चव्हाण घरी आला आणि “माझ्यासाठी ठेवलेलं जेवण कुठं गेलं?” असा जाब विचारला.
आईने शांतपणे “मीच जेवण केलं” असे सांगताच ओंकारचा संताप अनावर झाला.
रागाच्या भरात त्याने घरातील अॅल्युमिनियमची कढई उचलून थेट आईच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात संगीता जाधव गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
हल्ल्यानंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला. मात्र गंभीर जखमी अवस्थेतही धाडस दाखवत
संगीता जाधव यांनी एसटी बसने थेट मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
क्षुल्लक कारणावरून आईवर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


0 Comments