धक्कादायक! मुलगी देण्यास नकार दिल्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे कौटुंबिक वादातून एका २१ वर्षीय विवाहितेवर तिच्याच पतीसह सासरच्या
मंडळींकडून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा अभिजीत यादव ही सध्या माहेरी राहत असताना, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारास तिचा पती अभिजीत रतन यादव
व सासू राणी यादव हे कचरेवाडी येथे आले. यावेळी पतीने त्यांच्या लहान मुलीला आपल्या
ताब्यात देण्याची मागणी करत, “मुलगी दे, नाहीतर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली.
प्रतीक्षाने मुलगी देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या पती, सासू आणि नणंद पूजा काळुंगे यांनी मिळून तिच्यावर दगड व काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तिच्या आई-वडील आणि भावालाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली.
हल्ला इतका गंभीर होता की, सासूने दगडाने प्रतीक्षाच्या नाकावर वार केला, तर
नणंदेने तिला जमिनीवर ढकलले. पतीने तिच्या भावावर काठीने हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमी प्रतीक्षाला तातडीने मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर व पंढरपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी प्रतीक्षा यादव यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध
कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


0 Comments