Breaking News

खळबळजनक..हुंड्याच्या लोभात लेकीचा बळी! सोलापुरात नवविवाहितेची गळा दाबून हत्या

खळबळजनक..हुंड्याच्या लोभात लेकीचा बळी! सोलापुरात नवविवाहितेची गळा दाबून हत्या


सोलापूर : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात उघडकीस आली आहे. 

अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २२ वर्षीय सोनाली प्रतीक शिंदे हिची हुंड्यासाठी गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीचा विवाह चार महिन्यांपूर्वी प्रतीक शिंदे याच्याशी झाला होता. लग्नात टीव्ही व सोन्याची अंगठी न दिल्याच्या कारणावरून पती प्रतीक आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांनी तिचा सातत्याने छळ सुरू केला होता.

सोनालीच्या गरीब वडिलांनी परिस्थिती नसतानाही २० हजार रुपये देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सासरच्यांचा लोभ वाढतच गेला.

१२ एप्रिल रोजी पहाटे प्रतीक शिंदे याने सोनालीच्या वडिलांना फोन करून “सोनाली उठत नाहीये” असा बहाणा केला. मात्र संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवालात सोनालीची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

एका गरीब बापाने मोठ्या आशेने लेकीला सासरी पाठवले, पण हुंड्याच्या राक्षसी प्रथेमुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Post a Comment

0 Comments