शक्तीपीठ महामार्गावर ‘खेळ’ उघड? अशोक खरातची ११ एकर जमीन खरेदी;
जादा मोबदल्यासाठी आंब्यांची लागवड सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरेदीत मोठा घोटाळा
सोलापूर | प्रतिनिधी नियोजित शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील कथित भोंदूगिरी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याने
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण परिसरात तब्बल ११ एकर जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही जमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गात संपादित होणार असल्याची पूर्वकल्पना मिळाल्यानंतरच खरातने ही खरेदी केल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे अधिक मोबदला मिळवण्यासाठी संबंधित जमिनीत १० ते १२ फूट उंचीची आंब्याची झाडे लावण्यात आली
असून, सातबारा उताऱ्यावर डाळिंब पिकाची नोंदही करण्यात आल्याचे समोर आले आहे.
📌 राजकीय आरोपांमुळे उघड झाले कनेक्शन
याआधीच अशोक खरात याचे नाव राजकीय वर्तुळात गाजले होते. त्याच्या मुलीला माजी आमदार दीपक साळुंखे यांनी लाखो रुपयांचा प्लॅट भेट
दिल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर खरातचे सोलापूरशी असलेले संबंध उघडकीस आले.
📌 अधिकाऱ्यांशी संगनमताचा आरोप
महामार्गाचे रेखांकन आधीच मिळाल्यामुळे खरातने ही जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याने ही माहिती त्याला मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
२८ मार्च २०२४ रोजी रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची ही जमीन खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे.
📌 इतर ठिकाणीही गुंतवणूक
चौकशीतून असेही समोर आले आहे की, अशोक खरात याने शिर्डीसह इतर भागातही मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली आहे.
फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध ठिकाणी गुंतवल्याचा आरोप होत आहे.
📌 ‘मोठा रॅकेट’ असल्याची चर्चा
या प्रकरणात केवळ खरातच नव्हे, तर काही राजकीय नेते, अधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनीही महामार्गात जाणाऱ्या जमिनी आधीच खरेदी केल्याची चर्चा रंगली आहे.
त्यामुळे हा प्रकार केवळ एकट्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून मोठ्या रॅकेटचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


0 Comments