“सोलापूरकडे पुन्हा लक्ष द्या!” – शहाजीबापू पाटलांची शिंदेंकडे व्यासपीठावरून साद;
तानाजी सावंतांना सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगा; 5-6 आमदार निवडून आणण्याचा दावा
पंढरपूर : प्रतिनिधी शिवसेनेच्या वाढत्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यासपीठावरूनच थेट साद घालत
सोलापूरमध्ये पुन्हा लक्ष घालण्याची मागणी केली. विशेषतः माजी मंत्री तानाजी सावंत यांनी 2018-19 प्रमाणे पुन्हा सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंढरपूर येथे प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी ठामपणे दावा केला की, “योग्य नियोजन केल्यास सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे किमान 5 ते 6 आमदार निवडून येऊ शकतात.”
ते म्हणाले, “सावंत साहेब सध्या धाराशिवमध्ये अधिक लक्ष देत आहेत, पण सोलापूर हे त्यांचे ‘माहेर’ आहे. त्यांनी पुन्हा इथे सक्रिय व्हावे.” या विधानामुळे कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली.
पाटील यांनी पुढे सांगितले की, भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू होते. मात्र काही स्थानिक पातळीवरील अडथळ्यांमुळे हा प्रवेश लांबला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी आला असून, त्याच पद्धतीने पंढरपूरलाही मोठा विकासनिधी मिळू शकतो. “शिंदे हे तळागाळातील लोकांसाठी काम करणारे नेतृत्व आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाषणात शहाजीबापूंनी केलेल्या एका उल्लेखामुळे वातावरण हलकेफुलके झाले. पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांचा उल्लेख करताना त्यांनी चुकून “प्रणिती शिंदे” असे नाव घेतले. या घोळामुळे व्यासपीठावर आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.
👉 एकूणच, भालके आणि सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी कलाटणी येण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी निवडणुकांसाठी शिवसेना जोरदार तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.


0 Comments