खळबळजनक..मोबाईलच्या हट्टाने घेतला जीव; 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोहोळ हादरले”
मोहोळ : मोबाईल फोनच्या हट्टापायी तरुण पिढी किती टोकाचे पाऊल उचलते, याचा हृदयद्रावक प्रकार मोहोळ शहरात समोर आला आहे. नवीन मोबाईल घेऊन दिला नाही,
या कारणावरून बीबीएच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण जगदीश मायाचारी असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण मायाचारी हा बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सुमारे सात दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल फोन फुटला होता.
त्यानंतर त्याने घरी नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी सातत्याने हट्ट धरला होता. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी त्याला काही दिवस थांबण्यास सांगितले होते.
प्रवीणचे वडील जगदीश मायाचारी यांचे मोहोळ शहरात छोटे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान असून, त्याच उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पालकांनी समजावून सांगूनही प्रवीणचा हट्ट कायम होता.
दरवाजा तोडून उघडकीस आला प्रकार
३ एप्रिल रोजी रात्री जेवणानंतर प्रवीण आपल्या खोलीत झोपायला गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत तो बाहेर आला नाही. आईने आवाज दिला
तरी प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांना संशय आला. अखेर वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, प्रवीणने गळफास घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांत नोंद, तपास सुरू
या घटनेनंतर मायाचारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आई-वडिलांचा जबाब नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
चिंतेचा विषय
एका साध्या मोबाईल फोनसाठी तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून, पालक आणि समाजात मोबाईल व्यसनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


0 Comments