धक्कादायक! भरधाव टमटमचा कहर — बैलगाड्यांना जोरदार धडक; महिलेसह बैलाचा जागीच मृत्यू, भाविक जखमी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला–महूद रोडवर बुधवारी रात्री भीषण अपघात घडून एक महिला भाविक व एका बैलाचा जागीच मृत्यू झाला,
तर पाच जण गंभीर जखमी झाले. भरधाव व अनियंत्रित टमटमने दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला.
ही घटना रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वाकी शिवणे गावाजवळ घडली.
अपघातानंतर टमटम चालकासह तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव शालन महादेव मेटकरी (वय ५३, रा. महाजन फाटा, महूद) असे आहे.
या अपघातात एका बैलाचाही जागीच मृत्यू झाला असून तीन बैल जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये महादेव सुखदेव मेटकरी (६०), ऋतुजा दादासाहेब मेटकरी (७), गणपत धोंडिराम रुपनर
(६५), कल्पना गणपत रुपनर (५५) व युतराज बिरु रुपनर (११) यांचा समावेश असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, महाजन फाटा (महूद) व येडगेवाडी येथील मेटकरी व रुपनर कुटुंब आरेवाडी येथील
बिरोबा देवाच्या यात्रेसाठी गेले होते. दोन दिवसांचा मुक्काम उरकून बुधवारी देवदर्शन करून ते दोन बैलगाड्यांतून परतत होते.
सांगोला–महूद मार्गावर डाव्या बाजूने शांतपणे प्रवास सुरू असताना मागून भरधाव आलेल्या विनानंबर टमटमने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
दरम्यान, संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
👉 या घटनेमुळे सांगोला परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेफाम वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


0 Comments