सोलापूरच्या विकासाला वेग देण्यासाठी खासदार मोहिते-पाटील सक्रिय; रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा
नवी दिल्ली : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सुविधा सक्षम करण्याच्या उद्देशाने
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वे व माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेत विविध प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा केला.
या भेटीत जिल्ह्यातील वाहतूक, व्यापार, शेती व दळणवळण क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
मोडनिंब येथे गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) लवकर उभारण्याची मागणी करत या प्रकल्पामुळे औद्योगिक व कृषी मालवाहतुकीला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच, शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली किसान रेल्वे सेवा (दिल्ली–कोलकत्ता–मुजफ्फरनगर–शालिमार मार्ग) पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
अकलूज येथे एफएम रेडिओ केंद्र स्थापन करण्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, वारकऱ्यांच्या सोयीसाठी दादर–पंढरपूर–सातारा–दादर ही रेल्वे दररोज सुरू करून तिला “चंद्रभागा एक्सप्रेस”
असे नाव देण्याची महत्त्वाची मागणी करण्यात आली. यासोबतच पंढरपूर–देहू मेमू रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लातूर–कुर्डूवाडी–सोलापूर व मिरज–कुर्डूवाडी–दौंड या कॉर्ड लाईन उभारणीसाठी
तसेच मिरज–कुर्डूवाडी–लातूर रोड (सुमारे ३७५ किमी) रेलमार्गाचे दुहेरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, वाढत्या लोकसंख्येचा व पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा विचार करून सांगोला तालुक्यातील
जवळा व बामणी, पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
माढा मतदारसंघातील मोडनिंब रेल्वे स्थानकावर प्रमुख गाड्यांना थांबा, फूटओव्हर ब्रिज,
शेतकऱ्यांसाठी अंडरपास, आरक्षण काउंटर तसेच स्थानिक शटल गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, कुर्डुवाडी–पंढरपूर मार्गावरील जुना मीटर गेज ट्रॅक सध्या वापरात नसल्याने त्या ठिकाणी
असलेल्या रेल्वेच्या रिक्त जमिनीचा विकास करून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.


0 Comments