सांगोला पेपर चोरी प्रकरण! अभ्यास न झाल्याने विद्यार्थ्याची
धक्कादायक करामत; पोलिसांकडून ५० प्रश्नपत्रिका जप्त
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या भूगोल प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या प्रकरणात दहावीत शिकणाऱ्या
एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगोला विद्यामंदिर शाळेतील स्ट्रॉंग रूममधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या तब्बल ५० प्रश्नपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
विशेष म्हणजे, चोरी करणारा विद्यार्थी याच केंद्रावर परीक्षा देणारा होता. आज भूगोलाचा पेपर देण्यासाठी तो उपस्थितही राहिला होता. मात्र पेपर संपल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच हा प्रकार केल्याची कबुली दिली.
अभ्यास झाला नव्हता, म्हणून थेट पेपरच चोरी
चौकशीत विद्यार्थ्याने सांगितले की, इतर विषयांचे पेपर चांगले गेले होते; मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळेच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. चोरीपूर्वी त्याने स्ट्रॉंग रूमची पाहणी केली होती.
पहाटे २ वाजता कटर घेऊन शाळेत प्रवेश
घटनेच्या दिवशी पहाटे सुमारे २ वाजता तो इलेक्ट्रिक बाइकवरून शाळेत पोहोचला. त्याच्याकडे इलेक्ट्रिक कटर होते. त्याने स्ट्रॉंग रूमचे कुलूप कापून आत प्रवेश केला
आणि प्रश्नपत्रिकांची ट्रंक उघडली. त्यातून भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे दोन गठ्ठे व तीन कोऱ्या उत्तरपत्रिका घेऊन तो घरी गेला. त्याने त्यातील एक गठ्ठा उघडून प्रश्नपत्रिका पाहिल्याचेही कबूल केले.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी या विद्यार्थ्याकडून चोरीस गेलेल्या ५० प्रश्नपत्रिका, ३ कोऱ्या उत्तरपत्रिका, इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक जप्त केली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती.
पेपर वेळापत्रकानुसारच
या घटनेनंतर भूगोलाचा पेपर होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र बोर्डाने पेपर वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभर परीक्षा सुरळीत पार पडली.
गैरवापर झाल्याचे संकेत नाहीत
चोरी केलेल्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही गैरवापर झालेला नाही, याची खात्री पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, या अल्पवयीन विद्यार्थ्याला उद्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


0 Comments