धक्कादायक! पत्नीच्या खुनासाठी पतीचा थरारक कट;
सुपारी देऊन स्कुटी अपघाताचा बनाव, शिक्षिकेचा मृत्यू
बुलढाणा : एखाद्या गुन्हेगारी चित्रपटालाही लाजवेल असा थरारक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पत्नीचा खून करण्यासाठी पतीने मित्राच्या मदतीने सुपारी देत अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे उघड झाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत शिक्षिकेचे नाव वृषाली प्रकाश गावंडे असे असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. तर या प्रकरणात पोलिसांनी पती प्रकाश गावंडे, त्याचा साथीदार मंगेश चहुळकर आणि वाहन चालक मंगेश सूर्यवंशी यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वृषाली गावंडे या आपल्या स्कुटीवरून शाळेत जात होत्या. पातुर्डा ते कवठळ दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा साधा अपघात असल्याचे सर्वांना वाटत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेहाजवळ बसून पती प्रकाश गावंडे रडत असल्याचे दिसत होते. त्यामुळे गावकऱ्यांनाही हा अपघातच असल्याचे वाटत होते. मात्र वृषाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
जळगाव जामोद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक तपास केला. त्यानंतर स्कुटीला धडक देणारा वाहन चालक मंगेश सूर्यवंशी पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली.
सूर्यवंशीने सांगितले की, वृषाली गावंडे यांच्या पती प्रकाश गावंडे आणि त्याचा मित्र मंगेश चहुळकर यांनी एक लाख रुपयांची सुपारी देऊन अपघात घडवण्यास सांगितले होते. त्यानुसार टाटा पिकअपने स्कुटीला धडक देऊन हा अपघात घडवण्यात आला.
या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ पती प्रकाश गावंडे व मंगेश चहुळकर यांना अटक केली. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासांतच तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या थरारक कटकारस्थानामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


0 Comments