सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचा नवा डाव! गटनेतेपदी रश्मी बागल; सांगोल्याचे चेतनसिंह केदार ‘प्रतोद’
सांगोला : (प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पार्टीने आपल्या गटनेतेपदी करमाळा तालुक्यातील खंबीर नेत्या रश्मी बागल यांची निवड केली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी काळात जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असल्यामुळे या निर्णयाला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षाने जिल्हा परिषदेमध्ये प्रभावी नेतृत्व उभे करण्यासाठी अनुभवी आणि तरुण नेतृत्वाची सांगड घालत नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत.
मुंबईतील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गटनेतेपदी रश्मी बागल (करमाळा), उपनेतेपदी प्रदीप खांडेकर (मंगळवेढा), प्रतोदपदी चेतनसिंह केदार (सांगोला) आणि प्रवक्तापदी नेताजी खंडागळे (दक्षिण सोलापूर) यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील नेतृत्वाची मजबूत ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या हाती गटनेतेपद देत भाजपने महिला नेतृत्वाला मोठी संधी दिली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत भाजपची भूमिका अधिक आक्रमक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील युवा नेते चेतनसिंह केदार यांची ‘प्रतोद’ (Whip) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहातील पक्षशिस्त राखणे,
सदस्यांना मतदानासाठी आदेश देणे आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे ही जबाबदारी केदार यांच्यावर असणार आहे. सांगोला तालुक्यातून ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये लवकरच स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार असून त्या प्रक्रियेत गटनेत्याची भूमिका अत्यंत निर्णायक असते.
त्यामुळे रश्मी बागल यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजपच्या गटबाजीवर नियंत्रण येण्याची आणि पक्षाची बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मंगळवेढ्याचे प्रदीप खांडेकर आणि दक्षिण सोलापूरचे नेताजी खंडागळे यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या विविध भागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
नव्याने निवड झालेल्या या पदाधिकाऱ्यांवर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासोबतच पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


0 Comments