“तू मानसिक रुग्ण आहेस…” टोमण्यांना कंटाळून विवाहितेचा मृत्यू;
मंगळवेढा हादरला, पती अटकेत तर सासू-सासरे फरार
मंगळवेढा : लग्नाचे अत्तरही सुकले नाही तोच एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने मंगळवेढा शहरात खळबळ उडाली आहे.
सासरच्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय धनश्री संदीप जगताप हिने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
असून पती संदीप गौतम जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे, तर सासू-सासरे फरार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढवळस येथील मोरे कुटुंबातील धनश्री हिचा विवाह १६ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवेढा येथील सप्तश्रृंगीनगर परिसरात राहणाऱ्या
संदीप जगताप याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन
सासरी गेलेल्या धनश्रीच्या आयुष्यात मात्र लग्नानंतर काही दिवसांतच अडचणींचा डोंगर उभा राहिला.
मिरज येथे झालेल्या वैद्यकीय तपासणीत धनश्रीला मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे निदान झाले होते. या आजारामुळे तिच्या बोलण्यावर कधी-कधी ताबा राहत नव्हता.
मात्र या परिस्थितीत तिला आधार देण्याऐवजी सासरच्या मंडळींनी तिच्या आजारालाच छळाचे कारण बनवल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पती, सासू आणि सासरे हे धनश्रीला वारंवार टोमणे मारत असत. “तुला घरातील काम काहीच येत नाही” तसेच “तू मानसिक रुग्ण आहेस,
तू आमची फसवणूक केलीस” अशा शब्दांत तिचा अपमान केला जात असल्याचे समोर आले आहे.
या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून धनश्रीने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. ४ मार्च रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सुरुवातीला या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र धनश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
७ मार्च रोजी पोलिसांनी पती संदीप जगताप याला अटक केली. १० मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले
असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी आणखी एक दिवसाने वाढवली आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलिस तपास अधिक वेगाने सुरू आहे.
दरम्यान, “माझ्या मुलीचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी,” अशी आर्त मागणी धनश्रीच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.


0 Comments