अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात प्रशासन सतर्क;
गॅस एजन्सींना कडक सूचना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गॅस एजन्सी चालकांची घेतली बैठक
सांगोला : आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व घरगुती गॅस पुरवठ्याबाबत
खबरदारीचे उपाय देशभर राबवले जात असताना सांगोला तालुक्यातही प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.
याच अनुषंगाने शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी सांगोला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व घरगुती गॅस एजन्सी चालक व मालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीत नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
गॅस सिलेंडरचे वितरण केवळ अधिकृत बुकिंगधारकांनाच त्यांच्या बुकिंगनुसार करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य पद्धतीने सिलेंडर विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले.
तसेच गॅस सिलेंडरची साठेबाजी करून जादा दराने विक्री करणे, अनधिकृतपणे सिलेंडरचा पुरवठा करणे किंवा
एजन्सीच्या नावाचा गैरवापर करणे असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,
असा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या घरगुती गॅस पुरवठ्यात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गॅस वितरणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सांगोला पुरवठा विभागाच्या पथकास मदत म्हणून एक अधिकारी व चार अंमलदार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे पथक वेळोवेळी गॅस एजन्सींची पाहणी करून वितरणाची स्थिती तपासणार असून अनियमितता आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे.
संभाव्य अफवा, कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने गॅस विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने ही बैठक घेतल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता
गॅसची अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि कुठेही अवैध विक्री किंवा साठेबाजी होत असल्यास त्वरित पोलीस किंवा पुरवठा विभागाला कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.


0 Comments