खळबळजनक..गटनेतेपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; अतुल पवार आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीची तयारी
सोलापूर : जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेतेपदाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय वाद पेटला असून पक्षातील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.
अचानक विजयराज डोंगरे यांचे नाव गटनेते म्हणून जाहीर झाल्याने सांगोल्याचे माजी गटनेते अतुल पवार यांनी नाराजीचा सूर लावला
असून ते या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 सदस्यांच्या सह्यांचे पत्र देत अतुल पवार यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली होती. हे पत्र जिल्हा प्रशासनाकडेही सादर करण्यात आले होते.
मात्र काही दिवसांतच पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून मोहोळचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र काढण्यात आले.
या अचानक बदलामुळे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या निर्णयामुळे अतुल पवार समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून पक्षातील 11 सदस्यांमध्येच गटबाजी उफाळल्याचे चित्र दिसत आहे.
हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत अतुल पवार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
गटनेतेपदाच्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट स्पष्टपणे तयार होत असल्याची चर्चा असून याचा परिणाम आगामी
स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


0 Comments