खळबळजनक! जुनोनीत बेकरीसमोरून 48,500 रुपयांची धाडसी चोरी; सांगोला पोलिसांत गुन्हा
सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील जुनोनी येथे भररात्री धाडसी चोरीची घटना घडून परिसरात खळबळ उडाली आहे. फिरत्या बिस्कीट विक्रेत्याच्या वाहनातून तब्बल 48,500 रुपयांची रोकड
अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस चंद्रकांत यवगे (वय 22, रा. करगणी ता. आटपाडी, जि. सांगली) हे सोविस्को कंपनीच्या
बिस्कीट एजन्सीद्वारे व्यवसाय करतात. ते आपल्या ब्रिजा कार (MH 10 CN-3874) मधून करगणी, कोळा आणि जुनोनी परिसरात बिस्कीट पुरवठा करतात.
दि. 26 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता ते नेहमीप्रमाणे माल वितरणासाठी बाहेर पडले होते. करगणी व कोळा येथील दुकानदारांकडून त्यांना मिळालेले 48,500 रुपये त्यांनी गाडीच्या मागील बाजूस काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवले होते.
दरम्यान, रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ते जुनोनी येथील पुलाखालील आरमान बेकरी येथे माल देण्यासाठी थांबले. वितरण करून परत
आल्यानंतर गाडीत ठेवलेली पैशांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोधाशोध करूनही बॅग न सापडल्याने अज्ञात चोरट्याने रोकड लंपास केल्याची खात्री झाली.
घटनेनंतर त्यांनी तत्काळ सांगोला पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून, परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
👉 या घटनेमुळे जुनोनी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे.


0 Comments