सोलापुरात हॉटेलबाहेर ईव्हीएम; निवडणूक अधिकारी म्हणाले, 'आमच्या अधिकाऱ्यांकडून चूक झालीय; तिघे दोषी'
सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप
जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ शहराजवळील स्वराज धाब्यावर ईव्हीएम मशिन आढळून आल्या. त्या मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आहे.
त्यावर आज प्रशासनाने स्पष्टीकरण देताना 'त्या ईव्हीएम मशीन ह्या अतिरिक्त होत्या. त्यावर मतदान झालेले नाही,' असे म्हटले आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, त्या मशीनमध्ये कोणतेही मतदान झालेले नव्हते. या ईव्हीएम (EVM) मशीन्सच्या माध्यमातून कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
हा प्रकार ज्या अधिकाऱ्यांबाबत घडला, ते अधिकारी साधारण वर्षभरापूर्वी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत, असं कळालं. त्यांना निवडणुकीचे गांभीर्य नव्हते,
असं म्हणू शकत नाही. पण, संबंधित अधिकारी, त्यांचे सहकारी आणि वाहनचालकांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे दिसून आले. हा प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे, अशा चुका घडणं अपेक्षित नाही.
ईव्हीएमची काळजी घेणं, हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या अधिकाऱ्याकडून चूक झालेली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. संबंधित अधिकाऱ्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करत आहोत. वस्तुस्थिती काय आहे,
याची स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांचे खुलासे घेतलेले आहेत. संबंधित प्रकरणाचा पंचनामा करण्यात आलेला आहे.
वाहनचालकाने हलगर्जीपणा केला असे आम्हाला वटतंय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात झोनल अधिकारी त्यांचे साहाय्यक आणि संबंधित वाहनचालक दोषीत आहेत, असेही उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ आणि ११ पंचायत समितीच्या १३६ जागांवर शनिवारी चुरशीने ६६ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कोण जिंकणार, बाजी कोण मारणार याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच मतदान संपल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास
मोहोळ शहराजवळील पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वराज्य ढाब्याच्या बाहेर ईव्हीएम मशीन उमेश पाटील यांना आढळून आल्या आहेत. ईव्हीएम मशीन ह्या माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटातीलच आहेत, त्या कशासाठी बाहेर देण्यात आल्या आहेत, असा सवालही पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, मोहोळ शहराजवळच्या ढाब्यावर ईव्हीएम मशीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही तातडीने पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविले.
निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर ह्या तातडीने घटनास्थळी आल्या. त्या ईव्हीएम मशीन ह्या मी निवडणूक लढवत असलेल्या कुरुल जिल्हा परिषद गटातील होत्या, त्यामुळे आमची शंका वाढत गेली. त्या ठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणात जमला, त्यामुळे ईव्हीएमबाबत तर्कवितर्कांना उधाण आले.
ईव्हीएम म्हणजे नोटा छापण्याच्या मशीनइतकं महत्वाचं असतं. ते कुठेही खासगी जागेवर आढळून येणे गंभीर आहे. याबाबात आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही. पण ईव्हीएमबाबत अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे ते ईव्हीएम मशीन बॉक्समध्ये होते. ज्या ईव्हीएम मशीनवर मतदान झालं,
त्याचा नंबर आम्ही घेतलेला आहे. मात्र हे ईव्हीएम आतमध्ये असतं, त्यामुळे त्याचा नंबर आपल्याला बघता येत नाही, त्यामुळे संबंधित ईव्हीएम मशीनचा पंचनामा करून त्या इतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामात आणून ठेवलेल्या आहेत, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, झोनल अधिकाऱ्याकडे राखीव मशिन दिलेल्या होत्या. ती मशीन जमा करण्यासाठी संबंधित अधिकारी हे मोहोळमध्ये आले होते. त्यांनी ती मशीन गाडीत ठेवली होती.
त्या गाडीतील सर्व सहकारी, पोलिस हे गाडीतून उतरून हॉटेलमध्ये गेले. त्या गाडीच्या चालकाने सर्व ईव्हीएम खाली उतरल्या आहेत, असे समजून ते गाडी घेऊन बाहेर जेवायला गेले. तो चालक गेल्यानंतर मशील गाडीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे : सीमा होळकर
आम्ही संबंधित झोनल अधिकाऱ्यांना त्यांच्या मशीन जमा करण्याबाबत पुकारत असताना ते त्या गाडीकडे गेले होते. त्या वेळी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी त्यांनी घडलेला प्रसंग आम्हाला सांगितला.
संबंधित ईव्हीएम ह्या राखीव होत्या. मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन माझ्याकडे आल्या होत्या. त्या सर्व स्ट्रॉगरूमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सादर केला आहे, असे होळकर यांनी स्पष्ट केले.
'हॉटेलबाहेर ईव्हीएम आढळल्या हे खरं आहे'
याबाबत उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, हॉटेलवर ईव्हीएम मशीन आढळून आल्या हे खरं आहे. पण मशीन गैरप्रकार करण्याबाबत घेऊन जात होते, हा आरोप निराधार आहे. त्या मशीन अतिरिक्त आहेत.
पर्यायी मशीन म्हणून प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांकडे दोन मशील दिलेल्या असतात. चालकांच्या अनवधाने हा प्रकार घडला होता. गाडीतून त्या मशीन उतरवून घेण्याचे अधिकारी विसरले होते.




0 Comments