धक्कादायक! मागे 3 वर्षाची मुलगी सोडून विवाहितेनं संपवलं जीवन, सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप, पुण्यानंतर आता सोलापूरही हादरलं
पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता सोलापूर देखील अशाच एका घटनेनं हादरलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील चिंचोळी एमआयडीसीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहित महिलेचा मृतदेह आढळला आहे.
आशाराणी पवन भोसले असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. सासरच्या मंडळीनी आशाराणी पवन भोसले हिची हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.
मृत महिला तीन महिन्याच्या गरोदर असल्याची नातेवाईकांची माहिती
दरम्यान, या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षाची मुलगी असून त्या तीन महिन्याच्या गरोदर असल्याची नातेवाईकांनी माहिती दिली आहे.
आशाराणी भोसले हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्यामुळे अनेक वेळा वाद होतं होते, त्यावेळी चार ते पाच नातेवाईकांनी घरगुती वाद मिटवला होता,
अशी माहिती मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, सासरच्याच मंडळींनीच आशाराणीचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून केला जात आहे.
पोलिसांनी प्राथमिक कारवाई केली असून पुढील चौकशी सुरु
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक कारवाई केली असून मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती मोहोळ पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच सोलापूरमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळं सोलापूर हादरलं आहे. सासरच्या मंडळींनीच विविहितेची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्यांनी लावला आहे. पुण्यामध्ये देखील सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी
हगवणेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप वैष्णवी हगवणे यांच्या आी वडिलांनी केला आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या नवरा शशांक हगवणेसह सासू लता
हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे तसेच नणंद करिश्मा हगवणेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणाशी संबध असणाऱ्या निलेश चव्हाणला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
सुरुवातील वैष्णवीच्या बाळाला घेऊन निलेश चव्हाण गेला होता. या प्रकरणाची कसुन चौकशी सुरु आहे. दरम्यान, असेच प्रकरण सोलापुरात झालं आहे. त्यामुळं दिवसेंदिवस अशा घटना घडत असल्यामुळं चिंता व्यक्त होत आहे.
0 Comments