जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शारदादेवी करमाफी अभियान योजना संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात राबवावी
म्हणून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार ; सरपंच सज्जन मागाडे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी सध्या सर्वत्र खासगी शाळांचे पेव फुटल्याने पट संख्येच्या अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत
यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदादेवी करमाफी अभियान संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात राबवावे या मागणीसाठी आपण लवकरच सरपंचाचे शिष्टमंडळ घेऊन
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सक्षम आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली.
जवळा ता सांगोला या आध्यात्मिक नगरीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी
माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. सोशल मीडियावर आणि संपूर्ण राज्यात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. म्हणून हाच निर्णय संपूर्ण राज्यासाठी घेण्यात यावा यासाठी काही निधीची गरज लागली
तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निधीची तरतूद करून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना जीवनदान द्यावे. सध्या सर्वत्र शिक्षणाचे व्यावसायिकरण झाल्याने
खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी मोजावी लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला असे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत जर
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरवता येत येणार नाहीत. म्हणूनच विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि गेल्या १०० दिवसांत आपल्या कामाचा ठसा उमटवून ग्रामविकास खात्याला
वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे कर्तबगार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे या विषयाकडे लक्ष वेधून जिल्हा परिषद शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी पाणीपट्टी आणि सर्व स्थानिक कर माफ करावे
ही मागणी घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे शेवटी सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केले.
0 Comments