धक्कादायक! दूषित पिण्याच्या पाण्याचा ‘जार’; व्यवसाय सर्रास सुरू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला. ( प्रतिनिधी ) – उन्हाचा तडाखा अन् पाण्याची तीव्र टंचाई यामुळे पिण्याच्या पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे.
मात्र, या जारमध्ये सर्रास दूषित पाणी भरून त्याची विक्री केली जात असल्याने, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दूषित पाण्याच्या जारची विक्री करणाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नसल्याने राजरोसपणे हा गोरखधंदा सुरू आहे. यावर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी अशी चर्चा सांगोल्यात ठिकठिकाणी होत आहे.
आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी या दूषित पाण्यामुळेच केल्या जातात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या तक्रारींमध्ये वाढ होते. या काळात जागोजागी दूषित पाण्याची सर्रास विक्री केली जाते.
२० लिटर पाण्याचा जार दूषित पाणी विक्रीचे उत्तम माध्यम ठरत असून, त्यावर कोणाचेही अंकुश नाही. परिणामी सध्या शहर व परिसरात दूषित जारच्या पाणी विक्रीचा उद्योग जोरात सुरू आहे.
एका जारची किंमत ३० ते ४५ रुपये असून, विक्रेत्यांकडून यातील पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच नळाला येणारे पाणी भरून त्याची विक्री करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
सध्या घरांमध्ये अन् विविध आस्थापनांमध्ये जारचे पाणी वापरले जाते. मात्र, हे पाणी दूषित असल्याने, नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावताना दिसून येत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे दूषित पाणी विक्री करणाऱ्यांवर मात्र, कोणाचाच अंकुश नसल्याने सध्या दूषित पाणी विक्रीचा उद्योग सांगोला शहरात जोरात सुरू आहे.
सीलबंद पाणी विक्रीस ‘बीआयएस’ची परवानगी
एक लिटर बाटलीबंद किंवा २० लिटर सीलपॅक जारची विक्री करण्यासाठी ब्युरो ऑफ स्टॅण्डर्डची (बीआयएस) परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, सांगोल्यात एकाकडे ही परवानगी नाही.
तसेच, पाणी विक्री करण्याचा कारखाना सुरू करण्याअगोदर बीआयएसचे अधिकारी संबंधित प्रकल्पस्थळी जाऊन नियमाप्रमाणे प्रकल्पाची व्यवस्था तपासतात.
नियमाप्रमाणे उत्पादनांची निर्मिती होणार असेल तरच संबंधित प्रकल्पास प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न, औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांच्या
आधारे संबंधित प्रकल्पाला बाटलीबंद पाणी जार उत्पादन करण्यास परवानगी देते. मात्र, अशा प्रकारची परवानगी न घेताच दूषित पाणी विक्रीचे उद्योग सांगोल्यात जागाेजागी सुरू आहेत.
‘शॉप ॲक्ट’ वर दूषित पाण्याचा परवाना
खुल्या पद्धतीने पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक शॉप अॅक्ट परवाना आणि जिल्हा आराेग्य प्रयोगशाळेतून पाणी पिण्यासाठी योग्य आहे,
याचे प्रमाणपत्र स्वत:कडे घेऊन व्यवसाय करीत आहेत. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत घेऊन गेल्यावर अधिकारी त्या पाण्याची तपासणी करून प्रमाणपत्र देतात.
तपासणीसाठी सादर करण्यात आलेले पाणी कुठले आहे. नंतर त्याच दर्जाचे पाणी विकले जाईल किंवा नाही, याची कुठल्याही प्रकारची चाैकशी केली जात नसल्याने या व्यावसायिकांचे फावत आहे.
लाखो रुपयांची उलाढाल
जारमध्ये दूषित पाण्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. साधारणत: एका जारची किंमत ३० रुपये इतकी आहे. एका जारमध्ये २० लिटर पाणी असते. दररोज सरासरी दोनशे जारची विक्री केली जाते.
0 Comments