खळबळजनक..सांगोला तालुक्यात बचत गटाच्या महिलांची फसवणूक करणारे पती-पत्नी मोकाट
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला :- महूद (ता. सांगोला) येथे बचत गटाच्या नावाखाली अनेक गोरगरीब व मजूर महिलांची फसवणूक करणाऱ्या तसेच या बचत
गटांच्या नावावर बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे उचलून स्वतःच वापरणाऱ्या पती-पत्नींवर सांगोला पोलिसांत सुमारे चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या फसवणूक करणारे हे पती-पत्नी म मोकाट फिरत असून पोलीस तपासही दिशाहीन झाल्याने व गुंतवणूकदार महिला हवालदिल झाल्या आहेत.
महूद येथील मजुरी करून गुजराण करणाऱ्या जयश्री बिरा बेहरे यांनी याबाबत सांगोला पोलिसांत सुमारे चार महिन्यांपूर्वी तक्रार दिली आहे.
येथील शाहीर मुलाणी व त्याची पत्नी यास्मिन मुलाणी हे गावातील महिलांचे बचत गट चालवीत होते.
त्यांनी महिना ३०० रुपये सलग पाच वर्षे भरल्यास चांगला परतावा मिळेल, अशी माहिती दिली. त्यानंतर जयश्री बेहेरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांच्याकडे पैसे गुंतविले आहेत.
शिवाय बचत गटाच्या माध्यमातून फायदा होत असल्याचे सांगितल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईक महिलांनाही यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यांनी एकूण ७२ हजार रुपये जमा केले आहेत. संबंधित बचत गटाचे अध्यक्ष व सचिव कोण आहेत, अशी विचारणा केली असता त्यांनी त्यावर कोणतीही माहिती दिली नाही.
फक्त तुमचा बचत गट सुरू असून तुमच्या बचत गटाचे खाते महूद येथील बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे त्यांनी या मुलाणी पती-पत्नींकडे पैशाची मागणी केली
असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आपल्यासह गावातील शेकडो महिलांची बचत गटाच्या माध्यमातून मुलाणी पती-पत्नींनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. या दोघांनी कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे रीतसर नोंदणी न करता
हे महिला बचत गट काढून शेकडो गोरगरीब व मजूर महिलांचा बचत गटाच्या नावाखाली विश्वासघात केला आहे. कोणतीही मीटिंग न घेता तसेच पैसे जमा केल्याची कोणतीही पावती न देता पैसे जमा केले
म्हणून रजिस्टरवर सह्या घेतलेल्या आहेत. या मुलाणी पती-पत्नींनी गावातील गोरगरीब व मजूर महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जयश्री बेहेरे यांनी केली आहे.
पोलीस तपास दिशाहीन तर गुंतवणूकदार हवालदिल
फसवणूक झालेल्या महिलांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला.
मात्र, सुमारे तीन महिने उलटले तरी यातील संशयित आरोपी पती-पत्नी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
एकंदर पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे या प्रकरणाचा तपास तरी योग्य होणार का, आपल्याला न्याय मिळवून आपल्या कष्टाचे पैसे मिळणार का याची भीती या मजूर महिलांच्या मनामध्ये कायम आहे.
0 Comments