सांगोला तालुक्यातील 8 हजार 500 हेक्टर फॉरेस्ट क्षेत्रावरील 48 पानवठे पशूपक्षी व वन्यप्राण्यांची भागवत आहेत
तहान उन्हाळ्यात पक्षांसह प्राण्यांसाठी केली पाण्याची सोय : तुकाराम जाधवर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : उष्णतेच्या प्रमाणात कमालीचा बदल होत आहे. उन्हाचा चांगलाच पारा वाढत असल्याने पशु पक्षी यांच्यासह प्राण्यांची तहान भागवण्यासाठी
सांगोला तालुक्यातील 7 गावांमध्ये 8 हजार 500 हेक्टर फॉरेस्ट क्षेत्रावर वनविभाग अंतर्गत 48 पानवटे तयार करून पाण्याची सोय करण्यात आली आहे.
महिन्यातून दोन वेळा हे पानवटे भरून घेतले जात आहेत. यामध्ये फॉरेस्ट क्षेत्रावरील पशुपक्षी व प्राण्यांची मोठी सोय होत असल्याचे सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले आहे.
सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनविभागाच्या मालकीचे तालुक्यात सांगोला, महूद, आचकदानी, घेरडी, कटफळ, हटकर मंगेवाडी व कोळा आदी ठिकाणी राखीव वनक्षेत्र आहे.
या फॉरेस्ट क्षेत्रावर ससा, लांडगा, कोल्हा, तरस, खोकड, काळवीट, हरीण, मोर आदी पशुपक्षी व प्राणी आहेत. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी
यासाठी वन विभागाकडून पाणवठे तयार करण्यात आले आहे. सदर पानवट्यासाठी वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांचे नियंत्रण आहे. पानवट्यातील पाणी संपल्यास तातडीने पानवठे भरून घेतले जात आहेत.
सर्वसाधारण एका महिन्यातून दोन वेळा हे पानवटे भरले जात असल्याची माहिती आहे. यासाठी अंतर व पाण्याचा सोर्स त्यानुसार पाणी टँकर मालक यांना बिले अदा करण्यात येत आहेत.
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी पाणीटंचाई व उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फॉरेस्ट क्षेत्राबाहेर जावं लागू नये, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय फॉरेस्ट क्षेत्रांमध्ये व्हावी
म्हणून वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यामध्ये पाणी टाकण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. यासह पशु -पक्षी व प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसेय होऊ नये यासाठी वनविभागमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे.
सांगोला तालुका हा कमी पर्जन्यमान असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच उष्णतेचा पारा अधिकच वाढल्याने तालुक्यातील विहिरी व विंधन विहिरीच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे.
सांगोला तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मार्च - एप्रिल महिन्यामध्ये ही परिस्थिती असताना मे व जून महिन्यामध्ये उन्हाची आणखी तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाचा फटका जितका नागरिकांना बसत आहे. तितकाच पशुपक्षांनाही बसत आहे. यावरून वनविभागाचे पानवटे पशुपक्षी व प्राण्यांची तहान भागवत आहेत. असे ही वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले आहे.
पशुपक्षी प्रेमी संघटना, सामाजिक संघटना, नागरिक यांनी देखील पुढाकार घेऊन बाग, बगीचा, उद्याने याठिकाणी कृत्रिम पानवटे तयार करून
तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या जवळ पक्षांसाठी कृत्रिम पानवटा तयार करून या वन्यजीव प्राण्यांचे रक्षण या उन्हाळ्यापासून करणे गरजेचे आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पानवटा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. सांगोला शहरामध्ये चिमण्या सुद्धा आता दुर्मिळ होत चालल्या आहेत.
पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्यास आपण आपल्या पुढच्या पिढीला या पक्षांची माहिती कशी देणार आहोत. निसर्गामध्ये किलबिलाट सुरू ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी शक्य तेवढे पाण्याची सोय करावी.
0 Comments