सावधान महिलांनो दागिने सांभाळा;
सांगोला यात्रेत सोनसाखळी चोरी करणारे लुटारु सक्रिय
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीची यात्रा सध्या मार्केट यार्ड परिसरात सुरु आहे.
यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यात्रेत सोनसाखळी चोरी करणारे लुटारु सक्रीय झाले असून महिलांनी आपल्या दागिन्याची काळजी स्वत:च घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोनसाखळी चोरट्यांनी सांगोला यात्रेत उच्छाद मांडला असून सांगोला यात्रेत सलग दोन दिवस सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.चोरीच्या घटना सुरूच असल्याने पुन्हा एकदा पोलिसांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांकडून पळविले असल्याची घटना अंबिका देवी मंदिर परिसरात घडली.
तर दुसर्या दिवशी भरयात्रेत गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न ठरला. त्यामुळे महिलांनी यात्रेत गाफील राहणे हे चोरट्यांच्या फायद्याचे ठरत आहे.
दोन्ही घटनेची पोलीस स्टेशनला नोंद नसून नागरिकामध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे. यात्रेत बालचमूंसह महिलांची संख्या अधिक असल्याने सोनसाखळी चोरांचा वावर वाढला आहे.
गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोर्यांचेही प्रमाण सांगोला तालुक्यात वाढले असून सोनसाखळी चोर्यांचा पोलीसांकडून तपास लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले
असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
सांगोला यात्रेचा आज शेवट दिवस आहे. त्याचप्रमाणे आज दारुकामाने यात्रेची सांगता होणार आहे. दारुकामासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून त्यामुळे चोरट्यांसाठी ही पर्वणीच असणार
असून नागरिकांनी आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याचे आवाहन शहरातील जागरुक असणार्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0 Comments