सांगली हादरली! 4 वर्षीय चिमुकलीसोबत
शेजाऱ्याकडून भयंकर कृत्य, मृतदेह पोत्यात
घालून लोखंडी पेटीत लपवला जत तालुक्यातील घटना..
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करजगे गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
येथे एका नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली.
आरोपीने चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यात घालून ते पोतं एका लोखंडी पेटीत लपवून ठेवले होते. पोलिसांना आरोपीच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता हा भीषण प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी आपल्या आईसह राहतो, तर चिमुकली आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. आरोपीच्या घराच्या अंगणात एक बदामाचे झाड आहे.
घटनेच्या दिवशी (गुरुवारी) पीडित मुलगी बदाम घेण्यासाठी या झाडाजवळ गेली होती. यावेळी आरोपीची नजर तिच्यावर पडली. आसपास कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवले.
आरोपीने पीडितेला गोड बोलून जवळच्या एका पत्राच्या शेडमध्ये नेले. याठिकाणी त्याने 4 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पीडितेचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि ते पोतं एका लोखंडी पेटीत कोंबून ठेवले. त्यानंतर काहीच झाले नाही, असा बनाव करत तो आपल्या घरासमोरील खाटेवर झोपी गेला.
चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीकडे विचारपूस केली असता,
त्यानेही आश्चर्य व्यक्त करत चिमुकलीचा शोध घेण्याचा बनाव केला. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गावात शोध मोहीम सुरू केली. यावेळी आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी हा गावात संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना धक्कादायक सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments