मोठा दिलासा! शासकीय रुग्णालयात वृद्धांवर आता थेट उपचार;
रांगेत थांबवण्याची गरज नाही; सर्वच शासकीय रुग्णालयांत विशेष ओपीडी सुरू
उपचारासाठी वृद्धांना रांगेत थांबवण्याची गरज नाही. कारण आता वृद्धांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयासह सर्वच शासकीय रुग्णालयांत विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
यात फक्त वृद्धांनाच तपासले जाणार आहे. यामुळे त्यांची होणारी धावपळ आता वाचेल. शिवाय त्यांना एकाच ठिकाणी सर्वच उपचार मिळतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वृद्धांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालयात ‘जेरियाट्रिक क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.
याचे उद्घाटन नुकतेच डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही ओपीडी नेत्र ओपीडीच्या विरुद्ध बाजूस सुरू करण्यात आलेली आहे.
यामुळे वृद्धांना थेट तेथे जाऊन उपचार घेता येणार आहेत. शासनाच्या या उपक्रमामुळे वृद्धांना आवश्यक आरोग्य सेवा विनामूल्य मिळून आणि नियमितपणे याचा फायदा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू केली आहे. यात विविध विभागातील डॉक्टरांची टीम असणार आहे. त्यांना केसपेपर काढण्यासाठीही स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. विठ्ठल धडके, मेडिसीन विभाग प्रमुख
काय आहे जेरियाट्रिक क्लिनिक?
जेरियाट्रिक क्लिनिक म्हणजे वृद्धांसाठी विशेष उपचार आणि पुनर्वसन सेवा देणारे रुग्णालयातील विभाग आहे. या क्लिनिकमध्ये वृद्धांना निरोगी जीवन जगण्यासाठी उपचार आणि काळजी दिली जाते.
यात त्यांच्या विविध तपासण्याही आवश्यकतेनुसार केल्या जातात. शासनाच्या या उपक्रमामुळे वयोवृद्धांना मोठा दिलासा मिळाला आहे


0 Comments