google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोल्यात मतविभाजनाचा शेकापला फायदा 'बाबासाहेब प्रति आबासाहेब' घोषणा आली कामी

Breaking News

मोठी बातमी..सांगोल्यात मतविभाजनाचा शेकापला फायदा 'बाबासाहेब प्रति आबासाहेब' घोषणा आली कामी

मोठी बातमी..सांगोल्यात मतविभाजनाचा शेकापला फायदा 'बाबासाहेब प्रति आबासाहेब' घोषणा आली कामी


सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे.

 पाच हजार कोटींची विकासकामे असो अथवा तालुक्यातील लाडक्या बहिणींचीही म्हणावी एवढी साथ विद्यमान आमदारांना मिळाली नाही.

दोन्ही आजी-माजी आमदारांच्या मतविभाजनाचा फायदाही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास झाल्याचे चित्र दिसून आले.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या काळापासून सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या बालेकिल्ल्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचेच आजपर्यंत जादा काळ वर्चस्व राहिले आहे.

गतवेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांना माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांची ऐनवेळी साथ लाभल्यामुळे त्यांना ७६८ मतांनी निसटता विजय मिळाला होता.

या वेळच्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे- पाटील दोघेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन्ही शिवसेनेकडून उभे राहिले होते. 

गतवेळी निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी असलेले मतभेद दूर करून दोन्ही चुलत बंधू या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याच्या दिशेनेच कामाला लागल्याचे दिसून आले.

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यात शेकापमध्ये निर्माण झालेली पोकळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भरून काढली होती. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून ते शेतकरी कामगार पक्षाच्या व इतर कार्यकर्त्यांच्या कामासाठी, त्यांच्या सुख-दुःखाच्या कार्यातही आवर्जून जात- येत असल्यामुळे त्यांच्या व कार्यकर्त्यांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.

या निवडणुकीमध्ये त्यांना शेकापकडून तिकीट मिळाल्याने सत्तेपासून दुरावलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ईर्षेने या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करून विजयश्री खेचून आणल्याचे दिसून आले.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी विधानसभेची निवडणूक प्रथमच लढवली व त्यांना लक्षवेधी ५० हजार ९६२ मते मिळाली. शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८७० मते मिळाल्याने 

या दोघा आजी- माजी आमदारांच्या मतविभाजनामुळे शेकापला विजयश्री खेचून आणण्यात अडचण आली नाही. शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख एक लाख १६ हजार २५६ मते घेऊन ते २५ हजार ३८६ मतांनी विजयी झाले.

तालुक्यात पक्षापेक्षा वैयक्तिक गटांचा प्रभाव दिसून येतो. गटबाजीवरच विविध निवडणुका होत असताना दिसून येतात. विविध स्थानिक निवडणुका यातील दोन किंवा तीन गट एकत्र येऊन लढविलेल्या आहेत किंवा बिनविरोध केल्या आहेत.

यावेळी तालुक्यातील प्रमुख तिन्ही नेत्यांना मिळालेली मते, त्यांच्या मागे असणारा कार्यकर्त्यांचा संच यावरूनच या पुढील काळात तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार, हे मात्र निश्चित झाले आहे.

निकालानंतर सांगोल्यात 'बटेंगे तो कटेंगे'ची चर्चा

या निवडणुकीमध्ये गेल्यावेळी एकत्र असलेले आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील हे या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून रिंगणात उतरले. निवडणूकपूर्व काळामध्ये दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळी बरोबरच स्थानिक पातळीवरही बरीच चर्चा झाली होती.

दोघेही निवडणुकीत उतरले तर याचा फायदा विरोधकांना होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु शेवटी दोन्ही आजी-माजी आमदारांनी निवडणूक लढवली.

 या निवडणुकीमध्ये शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एक लाख १६ हजार २५६ मते मिळाली तर दोन्ही आजी-माजी आमदारांची मते एकत्रित केल्यास एक लाख ४१ हजार ८३२ एवढी होतात.

दोघे एकत्रित लढल्यास चित्र वेगळे दिसले असते, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. काहींनी तर 'बटेंगे तो कटेंगे' अशा आशयाच्या पोस्टही काही जणांनी केल्या. परंतु राजकारणात 'जर-तर'ला काहीही अर्थ नसतो, असे अनेक जाणकारांनी बोलूनही दाखवले.

'बाबासाहेब प्रति आबासाहेब' घोषणा आली कामी

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेकापवर चांगलीच पकड मिळवली होती. त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांनंतर कार्यकर्त्यांची गावोगावी मजबूत फळीच निर्माण केली होती.

शांत स्वभावाचे, प्रत्येकाशी संयमाने बोलणे व सुख- दुःखाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांची ओळख 'बाबासाहेब प्रति आबासाहेब' अशीच झाली होती.

 हीच त्यांची निर्माण झालेली ओळख सोशल मीडियावर व इतर घोषणाबाजीमुळे निवडणुकीत त्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले.

विजयश्री खेचून आणणारे शिलेदार

डॉ. अनिकेत देशमुख,

समाधान पाटील,

बाळासाहेब एरंडे,

अतुल पवार,

किरण पवार,

मारुती बनकर,

बाबूराव गायकवाड.

Post a Comment

0 Comments