'तुझा रेप झालाय का?, की तू बातमी करतेस...', ही आहे 'त्या' संपूर्ण प्रकरणाची Inside स्टोरी
बदलापूर: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर स्थानिकांचा एकच उद्रेक झाला
आणि काल (20 ऑगस्ट) तब्बल 9 तास आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे रोखून धरल्या होत्या.एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला अतिशय अर्वाच्य भाषा वापरल्याचं प्रकरण समोर आलं. पण महिला पत्रकाराने केलेला आरोप हा खोटा असल्याचा दावा हा वामन म्हात्रेंनी केला आहे.
आता या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं.. कोणी नेमका काय आरोप केला आणि सरकार-विरोधक यांच्यात कशी जुंपली हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
'तुझा रेप झालाय का?, की तू बातमी करायला आलीए', पत्रकार मोहिनी जाधवचा नेमका आरोप काय?
शिवसेना नेते वामन म्हात्रे यांनी नेमकं काय विधान केलं याबाबत मोहिनी जाधव म्हणाल्या की, 'मला म्हणाले की, मोहिनी तुम्ही पत्रकार सगळे आग लावता बातम्या करता आणि निघून जाता.'
'तर मी म्हटलं की, नक्की आम्ही काय केलंय दादा? तर ते म्हणाले की, तुम्ही शाहनिशा करत नाही की नक्की बलात्कार झालाय
की विनयभंग झालाय. तर मी म्हटलं की, आम्ही शाहनिशा करूनच बातम्या केल्या आहेत. त्यावर ते चिडले आणि मला म्हणायला लागले की, तुझा रेप झालाय का?
, की तू बातमी करायला आलीए. मी त्यांना म्हटलं की, तुम्हाला ही भाषा शोभत नाही.. एका महिला पत्रकारासोबत तुम्ही बोलताय. त्याचं तरी निदान भान ठेवा.' असं मोहिनी जाधव म्हणाल्या..
'...तर मी तिची पाया पडून माफी मागितली असती', वामन म्हात्रें नेमकं काय म्हणाले.
पत्रकार मोहिनी जाधव यांनी जे गंभीर आरोप केले त्यावर आता वामन म्हात्रे यांनी त्यांची बाजू मांडताना म्हटलं की, 'शंभर टक्के नाही
एक हजार टक्के.. मी नाही बोललो तर नाही बोललो.. जर माझ्या तोंडून अपशब्द निघाला असेल तर मी तिची पाया पडून माफी मागितली असती.
मी बोललोच नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल कसा काय होईल? त्यांनी पुरावे द्यावेत. मी काही कोपऱ्यात जाऊन तिच्याशी बोललो नाही.' असं म्हणत वामन म्हात्रेंनी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
'हा मस्तवालपणा कुठून येतो?', सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
बदलापूरमधील घटनेनंतर शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी आज (21 ऑगस्ट) बदलापूरमध्ये जाऊन महिला पत्रकाराची भेट घेतली. ज्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, 'शिंदे गटाचा पदाधिकारी म्हात्रे बोलतोय की, तुझ्यावर बलात्कार झालाय का, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का? हा मस्तवालपणा कुठून येतो?
शिंदे साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलंत. तुम्हाला जर कायदा-सुव्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला का अटक केली नाही?' असा सवाल करत त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं.
'तुम्ही का नाही थोबाड फोडलं?', चित्रा वाघांचा सवाल
दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या देखील आज बदलापूरमध्ये गेल्या आणि त्यांनी तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना मोहिनी जाधव यांच्याबाबतच्या घटनेविषयीही विचारणा केली.
त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, 'ज्या वेळेस आपल्याला असं कोणी बोलतं.. तुम्ही का नाही थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. मी सक्षम आहे मी पत्रकार आहे,
मी सक्षम आहे मी राजकीय कार्यकर्ता आहे. मला जर कोणी असं बोलेल ना तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि नंतर पोलिसांना सांगेन की आता काय करायचं ते करा.. तिथल्या तिथे उत्तर द्या..' असं चित्रा वाघ म्हणाल्या
वामन म्हात्रेंविरोधात विनयभंगासह, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कालच्या घटनेनंतर मोहिनी जाधव यांनी तात्काळ बदलापूर पोलीस स्थानकात जाऊन वामन म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही.
अखेर दबाव वाढल्याने तब्बल 24 तासानंतर शिवसेना नेते वामन म्हात्रेंविरोधात विनयभंगासह, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
0 Comments