खळबळजनक...नागपूरमध्ये का सुरू आहे भूकंपसत्र ? तीन दिवसांत तिसऱ्यांदा धक्का, जिल्हा पुन्हा हादरला
नागपूर परिसर सलग तीन दिवस भूकंपाने हादरल्याने स्थानिक प्रशासनही चिंतेत आहे. यासंदर्भात भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले,
नागपूर परिसरात लागोपाठ तीन दिवस भूकंपाचे हादरे बसणे, ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. हा ब्लास्टिंगचा तर प्रकार नाही ना. त्यामुळे प्रशासनाने याप्रकरणी चौकशी व कारवाई करणे आवश्यक आहे.
नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून, रविवारी पुन्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्याने उमरेड तालुका हादरला. दुपारी २.२८ वाजता बसलेल्या भूकंपाचे केंद्र उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या गावांमध्ये होते.
उल्लेखनीय म्हणजे, जिल्ह्याला तीन दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. सलग तीनवेळा भूकंप होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
हा नेमका भूकंप आहे की, खाणीतील स्फोटाचा प्रकार आहे, हे एक कोडेच आहे.
शुक्रवारी पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी आणि हिंगणा येथील झिल्पी येथे दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले होते.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.५ इतकी नोंदवली होती. त्यानंतर शनिवारीदेखील कुही परिसरात २.४ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता.
या दुसऱ्या धक्क्यातून सावरत नाही तोच आज रविवारीही आणखी सौम्य हादरे बसले. रिश्टर स्केलवर २.७ इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाचे केंद्र पुन्हा एकदा उमरेड परिसर होता.
उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड, मकरधोकडा या गावांमध्ये भूकंपाचे केंद्र होते. हा भूकंप दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी झाला. भूकंपाचे केंद्र भूगर्भाच्या आत पाच किमीवर केंद्र होते.
रविवारीही जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याचे नेमके कारण माहिती करण्यासाठी आम्ही
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र पाठविणार आहोत. ते याचा अभ्यास करून अहवाल देतील. त्यानंतरच निष्कर्ष काढता येईल.
-डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी
संकटाची चाहूल तर नाही ?
मुख्य म्हणजे, तिन्ही दिवस कुणालाच भूकंपाचा धक्का जाणवला नाही किंवा तसा भासही झाला नाही.
मात्र भूकंपाची ही हॅटट्रिक येणाऱ्या मोठ्या संकटाची चाहुल तर नाही ना, असा भीतीयुक्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.स्थानिक प्रशासन चिंतेत
0 Comments