मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने घेतले पेटवून; पुण्यातील धक्कादायक घटना
जेवळी : खाणावळीतील (मेस) एका कामगाराने 'आय लव्ह यू' असा संदेश पाठवत त्रास दिल्याने तसेच 'रूममेट' मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून वसतिगृहात पेटवून घेतलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी (ता.१९)
सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेणुका बालाजी साळुंके (वय १९, मूळ रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खाणावळीत काम करणाऱ्या सतीश जाधव आणि तिची
रूममेट मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (रा. भारती अभियांत्रिकी वसतिगृह, भारती विद्यापीठ, पुणे) या संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रेणुकाचे वडील बालाजी धोंडिबा साळुंके (४९, रा. जेवळी, ता. लोहारा) यांच्या फिर्यादीचा आशय असा ः रेणुका ही भारती विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. ती जात असलेल्या खाणावळीत काम करणाऱ्या सतीश जाधवनामक व्यक्तीने तिला मोबाइलवर 'आय लव्ह यू' असा संदेश पाठविला होता. त्यानंतर येता जाता तो तिला विचारणा करीत त्रास देत असे. या प्रकारामुळे रेणुका खूप घाबरली होती.
रेणुका ही खोलीत अभ्यास करीत असताना रूममेट मुस्कान सिद्धू हीसुद्धा वीज बंद करत असे. त्यामुळेही ती त्रासलेली होती. या प्रकारांना कंटाळून रेणुकाने सात मार्चला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
तेव्हापासून तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सतीश जाधव आणि मुस्कान सिद्धू यांनी त्रास दिल्यासंदर्भात तिने उपचारादम्यान पोलिसांना जबाब दिला होता. सहायक निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.


0 Comments