मोठी बातमी..विद्यार्थ्यांनो! दहावीला ३, बारावीला दोन भाषा अनिवार्य;
भारतीय भाषेतील शिक्षणासाठी प्रस्ताव
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावर मोठे बदल करत
दहावीपर्यंत दोनऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे.
तर अकरावी- बारावीच्या स्तरवर एकाऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. त्यापैकी किमान एक मूळ भारतीय भाषा असली पाहिजे, असे प्रस्तावात नमूद केले आहे.
भारतीय भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता हे मोठे फेरबदल करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. सीबीएसईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाळांना याबाबत माहिती देऊन सूचना मागविल्या होत्या.
शाळांकडून सूचना मागविल्यानंतर हे बदल लागू केले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हे बदल करण्यात येत असल्याचे सीबीएसईच्या या प्रस्तावात म्हटले आहे.
दहावीला दहा विषय नववी-दहावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याकरिता दहा विषय शिकावे लागतील. त्यात तीन भाषा आणि सात मुख्य विषय असतील. सध्या तीन मुख्य विषय आणि दोन भाषा असे स्वरूप आहे.
तीन अनिवार्य भाषांपैकी दोन भारतीय असाव्यात. गणित- संगणक, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण हे सात मुख्य विषय असतील.
बारावीला सहा विषय अकरावी-बारावीच्या स्तरावर दोन भाषा आणि चार मुख्य विषयांचा समावेश असेल.
दोन भाषांमध्ये किमान एक भारतीय असणे बंधनकारक आहे. एक भाषा आणि चार विषय धरून पाच विषयात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावे लागते.
बारावीतील सर्व विषयांचे चार गटात वर्गीकरण केले जाईल. भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय या चार गटांत विभागण्यात आले आहेत.
0 Comments