सांगोला येथे राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सव २०२४ प्रारंभ पवार यांच्या हस्ते
पंतप्रधान मोदीं करिता मी 'संताजी-धनाजी'; शरद पवार यांचा टोला
सांगोला - इतिहासात आपण वाचले आहे की, काही लोकांना छत्रपती शिवरायांच्यानंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत.
आज तशाच प्रकारची चिंता आमच्याबद्दल वाटते. त्यामुळेच अशी विधाने आमच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात,
असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला येथे सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
शरद पवार म्हणाले, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दलची आस्था या सरकारला राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो,
त्यावेळी कृषीमंत्र्यांकडून मला एकच उत्तर मिळते. तुमच्या आणि आमच्या दृष्टिकोनात फरक आहे. मी विचारले काय? त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जो पिकवतो त्याचाच विचार करता.
पण आम्ही जो खातो त्याचाही विचार करतो. खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यात काही वाद नाही. पण पिकवलेच नाही आणि पिकवणारा जगला नाही,
तर खाणारा काय खाणार? आणि मग खाणाऱ्यांची गरज भागवायची असेल, तर पहिले शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
तसेच चंद्रकांत पाटील यांच्यापुस्तकातील संदर्भ देत शरद पवार म्हणाले, कालच मी एक पुस्तक वाचले. त्या पुस्तकात लिहिलेले आहे की,
मोदी सरकारने महाराष्ट्रातील शंभर साखर कारखान्यांवरील एक्साइज ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार दहा वर्षे त्या खात्याचे मंत्री होते.
त्यांना हा निर्णय घेता आला नाही. तो आम्ही घेतला. खरी गोष्ट आहे. पण माझ्यापुढे प्रश्न होता की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे की साखर कारखान्यांवरील. त्यावेळी आम्ही
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचा निर्णय घेतला, असा टोलाही त्यांनी लगाविला.
देशातील शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत असताना त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकारला अजिबात आस्था नाही,
अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली. सांगोला येथे शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पुढाकाराने भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला.
शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला आस्था नाही; शरद पवार यांची टीकात्या वेळी बोलताना त्यांनी भाजप व मोदी सरकारवर शेतकरीविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप केला.
या वेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांची पत्नी रतनबाई देशमुख, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील,
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते. डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्वागत केले. या वेळी 'कृषिनिष्ठ' शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पवार म्हणाले, की पूर्वी देशात गहू, तांदूळ, साखर, फळफळावळ आदी अनेक प्रकारचे अन्नधान्य परदेशातून आयात करावे लागत होते. परंतु तत्कालीन सरकारच्या प्रयत्नातून देशात अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात आले.
त्यातूनच गहू, साखर, तांदूळ, फळफळावळ अनेक देशांना निर्यात करण्यात देशाने आघाडी घेतली आहे. परंतु मोदी सरकारने त्यात खो घालण्याचे धोरण अंगीकारत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे.
कांदा व साखर निर्यातीवर आणलेली बंधने हे त्याचेच द्योतक आहे. कांदा निर्यातीवर ४० टक्के अबकारीशुल्क लादण्यामागे देशात कांदा दर स्थिर राहावा
आणि महागाई नियंत्रणात यावी, हा हेतू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु कांदा दर आणि महागाई यांची तुलना करणे पूर्णत: चुकीचे आहे, असे पवार यांनी सुनावले.
0 Comments