सोलापूरात लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा
जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिकाला
सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.8) केली.
जिल्हा व्यवस्थापक महिंद्र मल्लिशा माने (वय-54), कंत्राटी लिपिक महेश श्रीमंत बनसोडे (वय-28) यांना लाच घेताना पकडण्यात आले. याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे तक्रार केली आहे.
पथकाने 15 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर आणि 8 डिसेंबर रोजी पडताळणी केली. महिंद्र माने याच्यावर सोलापूरचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
तक्रारदार यांची बहीण मूकबधिर आहे. त्यांच्या नावाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय सोलापूर कार्यालयाकडून कुक्कुटपालन (Poultry व्यवसायाकरिता 5 लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते.
मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक महिंद्र माने व कंत्राटी
कर्मचारी बनसोडे यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली.
सोलापूर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता मंजुर झालेल्या कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या बहिणीच्या
बँक खात्यात जमा करण्यासाठी माने व बनसोडे यांनी 20 हजार रुपये लाच मागून 15 हजार रुपये स्वीकारण्यास
सहमती दर्शवली. पथकाने शुक्रवारी सापळा रचला. कंत्राटी कर्मचारी बनसोडे याच्यामार्फत 15 हजार रुपये लाच
स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक सहाय्यक पोलीस फौजदार
चडचणकर, पोलीस अंमलदार कोळी, शिरीष कुमार सोनवणे, स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, राजू पवार,
चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली.


0 Comments