खळबळजनक घटना...दारूसाठी नेहमीच पैसे मागणाऱ्या मुलाचा वडिलांकडून खून सोलापूर जिल्ह्यातील घटना...
सोलापूर : दारू पिण्यासाठी दररोज पैसे मागणा-या आणि पैसे न दिल्यास मारहाण करणाऱ्या मद्यपि मुलाचा अखेर वृध्द वडिलांनीच चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोलापुरात इंदिरा गांधी विडी घरकूल वसाहतीत घडली.
श्रीनिवास मल्लय्या यासम (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे.त्याची पत्नी वाणिश्री यासम हिने यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत श्रीनिवासचे वडील मल्लय्या आगय्या यासम (वय ६२) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हैदराबाद रस्त्यावर इंदिरा गांधी विडी घरकूल वसाहतीत यासम कुटुंबीय राहतात. मृत श्रीनिवास यास दारूचे प्रचंड व्यसन होते. स्वतः कामधंदा न करता दारूचे व्यसन भागविण्यासाठी तो दररोज वृध्द वडिलांना दमदाटी करून पैसे मागायचा. पैसे न दिल्यास चिडून वडिलांना मारझोड करायचा.
त्याच्याकडून हा त्रास नेहमीच व्हायचा. त्यामुळे वडील मल्लय्या वैतागले होते. नेहमीप्रमाणे घरात श्रीनिवास याने वडिलांना दारूसाठी पैसे मागितले असता त्यांनी दिले नाहीत. तेव्हा श्रीनिवास त्यांच्या अंगावर गेला.
तेव्हा चिडून वडील मल्लय्या यांनी स्वयंपाक घरातून चाकू आणला आणि मुलाला भोसकले. मानेवर, गळ्यावर, डोक्यावर, हाताच्या दंडावर वार होऊन श्रीनिवास गंभीर जखमी झाला. त्यास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल केले असता अखेर त्याचा मृत्यू झाला.
0 Comments