सांगोला तालुक्यात वावरं हाय पण पॉवर न्हाय ; डाळिंब बागा जळाल्या,
तरकारीला भाव मिळेना; जगाचा पोशिंदा अनेक अडचणीने संकटात
सांगोला - आपला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी राजाला आपल्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोशल मीडियावरही 'वावर हाय तर पावर हाय' अशा पोस्ट फिरत असतात.
परंतु सध्या परिस्थितीत डाळिंबाच्या रोगाने गेलेल्या बागा, तरकारी भाजी - पिकांना कवडीमोल असणारा दर, पावसाची असणारी अनियमितता यामुळे सध्या शेतकरीच 'वावर हाय पण, पावर काय नायं' असा बोलू लागल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसत आहे.
सांगोला तालुक्याची खरी ओळख ही दुष्काळी तालुका म्हणूनच आहे. अशा दुष्काळी परिस्थितीही येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाच्या बागा फुलवल्या व त्यातून मोठे उत्पन्नही घेतले.
या डाळिंबाच्या निर्यातीतून सांगोल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले व दुष्काळी असणारा तालूका 'डाळिंब पिकांचा सांगोला' म्हणून ओळखला जाऊ लागला.
परंतु याच डाळिंबाच्या बागा तेल्या व विशेषतः मर रोगाने मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी जळून जाणाऱ्या डाळिंब बागा काढून टाकल्याने सध्या डाळिंब उत्पादक शेतकरी पूर्वापार चालत आलेले मका, ज्वारी, गहू, बाजरी अशा पिकांकडे वळला आहे.
आपल्या कुटुंबाला आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून अनेक जणांनी तरकारी ढोबळी मिरची, टोमॅटो, घेवडा, दोडका, कारले, हिरवी मिरची इत्यादी अनेक तरकारी पिके घेऊ लागला आहे.
परंतु अनेक शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपला मालविक्रीस येतो त्या - त्या वेळेस बाजारातील भाव कोसळण्याचा अनुभव आला आहे. अशी तरकारी पिके घेणाऱ्यांची संख्या जास्त झाल्याने
तालुक्यात उत्पादनही दिवसेंदिवस वाढत आहे. याचाही परिणाम पिकांच्या दरावर होत आहे. कुटुंबाला आर्थिक काहीतरी हातभार लागावा म्हणून घेतलेली अशी तरकारी पिकांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
'वावर हाय तर पावर हाय !' -
शेतकऱ्यांच्या अनुषंगाने कोणताही विषय असला की सोशल मीडियावर 'वावर हाय तर पावर हाय' अशा पोस्ट केल्या जातात. शेतकऱ्यांची महत्त्व, जगाचा पोशिंदा, अन्नदाता कसे आहे ते आवर्जून सांगितले जाते.
परंतु अशा वावर (शेतजमीन) असणाऱ्या व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडेच सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यांची पॉवर वाढवण्यासाठी शासनासह सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
पिकाचे दर वाढले की ओरड, किंमत कमी झाली की दुर्लक्ष -
शेतकऱ्यांनी पिकवलेले कोणतेही पिका असो वर्षातून एखाद्या - दुसऱ्या वेळेस त्याची किंमत वाढली की सर्वत्र त्याचे ओरड होते.
सामान्यांना कशाप्रकारे आर्थिक भार सोसावा लागतो याबाबत सोशल मीडियासह सर्वत्रच त्याची चर्चा केली जाते. शासनही लगेचच त्या पिकाची, मालाची आयात करून व इतर मार्गाने दर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
परंतु एखाद्या पिकाची कवडीमोल किंमत होताना शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. अशावेळी पिकवणाऱ्या पोशिंद्याच्या डोळ्यातील अश्रू मात्र कोणालाच दिसत का नाहीत ?
शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीही कोणी देईना -
एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलीही कोणी देण्यास तयार होईनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
सध्या लग्नासाठी नोकरदारांना प्राधान्य मिळत असून शेतकरी आपल्या मुलांना लग्नासाठी मुंबई, पुण्याला नेकरीसाठी पाठवत आहे. अशा परिस्थितीतही शेतकरीसुद्धा आपल्या मुलीला नोकरदारच मुलगा पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डाळिंब, द्राक्षेनंतर आम्ही सध्या वेलवर्गीय पिके वर्षभर घेत असतो. परंतु अशा वेलवर्गीय पिकांना एकरी एक लाख ते दीड लाखाच्या आसपास खर्च येतो. परंतु बाजारात कायमस्वरूपी भाव नसल्यामुळे, खते, औषधांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे याचा तोटाच सहन करावा लागत आहे - हरिदास देशमुख, शेतकरी, संगेवाडी.
0 Comments