google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...सरपंचाने केला ग्रामपंचायत सदस्याचा खून !

Breaking News

धक्कादायक प्रकार...सरपंचाने केला ग्रामपंचायत सदस्याचा खून !

धक्कादायक प्रकार...सरपंचाने केला ग्रामपंचायत सदस्याचा खून !


 ग्रामपंचायतीमधील मागील हिशोबाच्या कारणावरून झालेल्या  वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून केल्याप्रकरणी सरपंचाला बेड्या ठोकण्यात आल्या असून वैद्यकीय अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

अनेक ग्रामपंचायतीत राजकीय कारणावरून सदस्य आणि सरपंच यांच्यात वाद असतात तर काही ग्रामपंचायतीत आपसात भ्रष्ट्राचार करण्यावरून वाद होत असतात. 

ग्रामपंचायत बैठकीत मागील खर्चाचा हिशोब मागितल्याच्या कारणावरून सरपंच आणि उप सरपंच यांनी, ग्रामपंचायत सदस्य गणेश रावसाहेब चव्हाण यांना बेदम मारहाण केली 

आणि ही मारहाण त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली आहे. जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे ही घटना घडली. या घटनेने जामखेड तालुक्यासह खर्डा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत रेखा रावसाहेब रावण यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

गणेश चव्हाण हे २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले होते. शरद जगताप आणि गणेश  हे दोघेही एकाच  प्रभागातून विजयी झाले होते. त्यानंतर सरपंच पदासाठी गणेश यांनी शरद जगताप यांना मतदान केले होते. 

एक वर्षानंतर गणेश चव्हाण यांना सरपंच करण्याचे याचवेळी ठरलेले होते. पण वर्ष उलटले तरी ठरल्याप्रमाणे घडत नव्हते .  सरपंच शरद जगताप याने एक वर्षानंतरही राजीनामा दिला नाही. यामुळे मयत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत वाद होत होते. असे फिर्यादीत म्हटले आहे. 

ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी गणेश चव्हाण गेल्यानंतर त्यावेळी सरपंच जगताप आणि गणेश यांच्यात वादावादी झाली होती. मागील खर्चाचा हिशोब मागितल्यामुळे त्यांच्यात भांडण जुंपले होते. 

त्यानंतर घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून,  हिशोब मागतो काय? असे  म्हणत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांनी धमकीही दिली. 

तू आमच्या नादाला लागू नको, नाहीतर तुला सोडणार नाही,असे म्हणत शौकत मुलाणी याने माराहाण केली. यावेळी सरपंच जगताप याने पाठीमागून डोक्यावर मारले. या मारहाणीमुळे आपले डोके दुखत आहे असे गणेश याने घरी सांगितले होते. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात गणेशला उलटी झाली.

 यामुळे त्यांना उपचारासाठी जामखेड येथील खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटीस्कॅन चा अहवाल आल्यावर त्यांना नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. 

नगर येथील रुग्णालयात उपचार घेताना  गणेश मयत झाला. त्यामुळे पोलिसांची केलेली अधिक चौकशी आणि पोलिसात गणेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार खर्डा पोलिसांनी सरपंच आणि उप सरपंच यांच्या विरोधात, 

ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण यांचा खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाची कुणकुण लागताच सरपंच शरद जगताप आणि शौकत मुलाणी हे दोघेही पसार झाले आहेत. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments