google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील केळी बांधावरून चालली इराणकडे; 22 रुपये किलो किमतीचा विक्रमी भाव

Breaking News

सांगोल्यातील केळी बांधावरून चालली इराणकडे; 22 रुपये किलो किमतीचा विक्रमी भाव

 सांगोल्यातील केळी बांधावरून चालली इराणकडे; 22 रुपये किलो किमतीचा विक्रमी भाव


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला :- डाळिंबामुळे  कॅलिफोर्निया  अशी ओळख असलेला सांगोला तालुक्यातील हा भाग तेल्या आणि मर रोगाने उध्वस्त झाला आहे.

यामुळे आता हा डाळिंब उत्पादक शेतकरी  केळी आणि इतर पिकांकडे वळू लागला आहे. मात्र अतिशय कष्टाळू म्हणून ओळख असणाऱ्या या भागातील जिगरबाज शेतकऱ्यांनी आता निर्यातक्षम केळीचं दर्जेदार उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

 त्यामुळे इराणमधील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन विक्रमी भावानं केळी खरेदी करू लागले आहेत. त्यामुळेच आता या निर्यातक्षम केळीला इराण, अफगाणिस्तान, दुबईमध्ये मोठं मार्केट मिळालं आहे.

इराण, दुबई येथील व्यापारी थेट महूद येथील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन केळी खरेदी करताना दिसत आहेत. केळीच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालही होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महूद परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन घेतलं आहे. येथील शेतकरी प्रतीक प्रदीप ताटे यांनी दोन एकरावर जी-9 जातीच्या 2500 केळीच्या रोपांची लागवड केली. 

यासाठी दोन ओळीतील अंतर सहा फूट, तर दोन रोपांमधील अंतर पाच फूट ठेवलं. लागवडीपूर्वी शेणखताची मात्रा दिली. त्यानंतर केळीच्या रोपांची लागवड करून पांढरीमुळे चालावी यासाठी ह्युमिक ॲसिड सोडण्याचं नियोजन केलं. 

लागवडीनंतर केळीची वाढ व्हावी, यासाठी दर आठ दिवसाला 19 : 19 ची फवारणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यकतेनुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी केली. लागवडीनंतर तीन महिन्यांनी बांधणी करून खतांचा डोस दिला.

 त्यानंतर सलग दोन महिने प्रत्येक आठ दिवसाला एकरी पाच किलो याप्रमाणे 13 : 00 : 45 ड्रीपद्वारे सोडलं. या नियोजनामुळे झाडांना बळकटी येऊन त्यांची चांगली वाढ झाली. केळीची वेण होताना योग्य ती फवारणी करून पिकांचं रोगराईपासून संरक्षण केलं.

 केळीचं फळ फुगणं आणि चकाकी येण्यासाठी एकरी पाच किलो प्रमाणे 00 : 60 : 20 ची मात्रा दिली. या सर्व खतमात्रांमुळे केळीच्या घडांची वाढ योग्य आणि वेगानं होवून घडाचं वजन सुमारे 35 ते 40 किलो भरलं आहे.

त्यामुळे आता केळाच्या बागा निर्यातक्षम फळानं लगडल्या असून आखाती देशातील व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर येऊन मालाची खरेदी करत आहेत. 

महूद येथील शेतकरी प्रतीक ताटे यांच्या केळी पिकाला इराण आणि अफगाणिस्तान मोठं मार्केट मिळालं आहे. महूदची केळी इराणच्या मार्केटमध्ये प्रति किलो बावीस रुपये दरानं पोहोचली आहेत. 

प्रतीक ताटे यांची केळी खरेदी करण्यासाठी इराणहून वाहिद हे व्यापारी थेट त्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचले आहेत. प्रतीक ताठे याना आपल्या दोन एकर बागेसाठी आत्तापर्यंत सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च झाला असून यातून आपणास 15 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments